बदलापूरच्या शाळेतील साडे तीन वर्षांच्या दोन चिमुकलींवरील अत्याचाराच्या घटनेमुळे राज्यातील वातावरण तापलं आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका वक्तव्याचा दाखला देत निशाणा साधला. एकनाथ शिंदे यांनी एका बलात्कारच्या घटनेत आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात आली होती, असं सांगितलं होतं. त्यांच्या याच वक्तव्यावरुन उद्धव ठाकरे यांनी संबंधित घटनेची एसआयची चौकशी करण्याची मागणी केली होती. तसेच संबंधित प्रकरण काय होतं? याची माहिती देण्याची मागणी केली होती. यानंतर एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरच्या कार्यक्रमात कोर्टाची कॉपी दाखवत आरोपी तेजस दळवी याला फाशीची शिक्षा झाल्याचं सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं नेमकं प्रकरण काय आहे, याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
बलात्काराच्या आरोपात राज्यात फाशीची शिक्षा सुनावल्याची घटना 6 महिन्यांपूर्वीची आहे. 6 महिन्यांपूर्वी 2024 मध्ये पुण्यातील मावळच्या कोथुर्णेतील बलात्कार प्रकरणात कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली होती. बलात्काराचं हे प्रकरण 2 ऑगस्ट 2022 मध्ये म्हणजेच 2 वर्षांपूर्वीचं होतं. या प्रकरणाचा खटला 10 महिन्यात निकाली लावण्यात आला होता. 7 वर्षांच्या मुलीची मावळच्या कोथुर्णे गावात बलात्कारानंतर हत्या झाली होती. तेजस दळवी असं 28 वर्षीय आरोपीचं नाव होतं.
या प्रकरणातील पीडितेचा शाळेच्या मागे दाट झाडीत मृतदेह सापडला होता. या प्रकरणात आरोपीची आईदेखील दोषी ठरवण्यात आली होती. आरोपीच्या आईने पुरावे नष्ट केल्याने तिला 7 वर्षांची शिक्षा सुनावली. या प्रकरणी जलद गतीने सुनावणी घेण्यात आली होती.
विशेष सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी सरकारी पक्षाची बाजू कोर्टात मांडली होती. विशेष न्यायाधीश बी. पी. क्षीरसागर यांनी आरोपीला फाशीची शिक्षा ठोठावली होती. यानंतर 19 ऑगस्ट 2022 ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पीडितेच्या कुटुंबाला 5 लाखांची मदत जाहीर झाली होती.