बांग्लादेशात बुधवारी एका तलावाच्या किनाऱ्याजवळ 32 वर्षाच्या महिला पत्रकाराचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. बांग्लादेशात राजकीय अस्थिरता निर्माण झाल्यानंतर हिंसाचाराचे अनेक गुन्हे घडले. यात शेकडो लोकांचा मृत्यू झाला. न्यूज एंकर सारा रहनुमाचा अशा स्थितीत झालेला मृत्यू धक्कादायक बाब आहे. पण त्याहीपेक्षा धक्कादायक म्हणजे या मृत्यूमागच रहस्य आहे. पोलिसांनी तपासाआधी मृत्यूच्या कारणाबद्दल काहीही बोलण्यास नकार दिला आहे. साराची हत्या करण्यात आलीय असा तिच्या कुटुंबाने आरोप केला आहे. मृत्यूआधी सारा रहनुमाने तिच्या फेसबुक पोस्टवरुन दोन पोस्ट शेयर केल्या होत्या. त्यामुळे मृत्यूच रहस्य अधिक गडद झालय. या प्रकरणात पतीबद्दलची साराची नाराजी, तिचा एक मित्र आणि चॅनलचा मालक असे सगळेच आहेत.
बुधवारी संध्याकाळी पादचाऱ्यांना तलवाच्या किनाऱ्याजवळ एक मृतदेह तरंगताना दिसला. तो मृतदेह बाहेर काढून ढाका मेडिकल कॉलेज रुग्णालयात पाठवण्यात आला. डॉक्टरांनी रात्री दोन वाजता मृत घोषित केलं. 32 वर्षाची सारा ढाकाच्या कल्याणपुरमध्ये रहायची. गाजा टीव्हीमध्ये न्यूजरुम एडिटर म्हणून काम करायची. तिच्या कुटुंबाने मृत्यूमागे हत्येचा संशय व्यक्त केलाय.
पोस्टच्या अखेरीस दोन हार्टचे इमोजी
साराने मृत्यूच्या आदल्या रात्री फेसबुकवर एक पोस्ट केली. त्यात तिने मित्र फहीम फैसलला टॅग केलं. काही फोटो पोस्ट केलं आणि संदेश लिहिला. “तुझ्यासारखा मित्र असणं ही खूप चांगली गोष्ट होती. देव नेहमीच तुझ भलं करो. तू लवकरच तुझी सर्व स्वप्न पूर्ण करशील अशी अपेक्षा आहे. आपण सोबत मिळून प्लानिंग केली होती. माफ कर, त्या सर्व योजना आपण पूर्ण करु शकणार नाही. ईश्वर तुला आयुष्यात यश देईल” पोस्टच्या अखेरीस दोन हार्टचे इमोजी सुद्धा टाकले होते.
पण मंगळवारी रात्री ती….
या पोस्टआधी दुसऱ्या एका पोस्टमध्ये तिने लिहिलेलं, ‘जिवंतपणी मृत बनून राहण्यापेक्षा मरण केव्हाही चांगलं’ एकूणच या प्रकरणात बरीच रहस्य असल्याचे संकेत मिळत आहेत. ऑफिसमधून ती ऑफिसच्या कारने घरी यायची. पण मंगळवारी रात्री ती एक मित्राच्या बाईकवरुन येत होती, असं तिच्या कुटुंबियांनी सांगितलं.
नवऱ्याने काय सांगितलं?
साराच तिच्या नवऱ्याबरोबर पटत नव्हतं. तिचा नवरा सईद शुवरेने सांगितलं की, “7 वर्षांपूर्वी त्यांचं लग्न झालं. अलीकडे त्यांच्यामध्ये कुठलं भांडण झालं नव्हतं. दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतलेला”
राजकीय द्वेषातून हत्या का?
साराच्या मृत्यूमागे राजकीय द्वेष असण्याची सुद्धा शक्यता आहे. साराच्या गाजी टीवी चॅनलचा मालक गुलाम दस्तगीर गाजी याला अटक करण्यात आली आहे. गुलाम दस्तगीर शेख हसीना सरकारच्या जवळचा मानला जायचा. तो मंत्री सुद्धा होता. बांग्लादेशमध्ये आवाम लीग आणि हसीन यांच्याशी संबंधित लोकांच्या हत्या झाल्या आहेत.