पुण्यातील खानापूर पाबे घाट रस्त्यावरील रांजणे येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. वीजेच्या टॉवरवर चढून तारांची चोरी करताना एक जण खाली पडला. मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीला त्याच्यासोबत असलेल्या दोन साथीदारांनी पाबे खिंडीतील दुर्गम डोंगरातच खड्डा करून पुरलं. बसवराज पुरंत मॉगनमनी असं मृत तरुणाचं नाव आहे. तो 22 वर्षांचा होता. टॉवर वर चढून लोखंडी ब्लेडने तारांची वायर कापताना बसवराज हा दिडशे फुट खाली कोसळून मृत्युमुखी पडला. नंतर त्याचा मृतदेह त्याचे साथीदार रुपेश अरुण येनपुरे आणि सौरभ बापु रेणुसे यांनी पाबे डोंगरातच पुरला.
गुरुवारी मध्यरात्री रात्री वेल्हे पोलिसांना या बाबत माहिती समजली. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी उशिरा सिंहगड रोड पोलिस आणि वेल्हे पोलिसाचे पथक आरोपीनां घेऊन घटनास्थळी दाखल झाले. रेस्क्यू पथकाचे तानाजी भोसले, गणेश सपकाळ ,संदीप सोलस्कर गुलाब भोंडेकर ,संजय चोरघे आदींनी मध्यरात्री दुर्गम पाबे डोंगरात धाव घेतली मात्र अंधार आणि पावसामुळे पहाटे साडेतीन पर्यंत घटनास्थळाचा शोध लागला नाही, अशी माहिती वेल्हे पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अप्पासाहेब पडळकर यांनी दिली.
अजून मृतदेह सापडलेला नाही
काल मध्यरात्री मृत बसवराज याच्या दोन साथीदारांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. सिंहगड पोलिस ठाण्याचे अधिकारी, पोलीस जवान तसेच वेल्हे पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नितीन खामगंळ तसेच महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली रेक्सु पथकाकडून मृतदेहाचा शोध घेतला जात आहे अशी माहिती वेल्हे पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अप्पासाहेब पडळकर यांनी दिली.
मागच्या महिन्यात कधी घडली घटना?
मागच्या महिन्यात 13 जुलै रोजी मयत बसवराज याच्यासह रुपेश येनपुरे आणि सौरभ रेणुसे हे तिघेजण रांजणे येथे असलेल्या महावीज वितरण कंपनीच्या वीजेच्या टॉवरवर तांब्याच्या तारांची चोरी करण्यासाठी गेले होते. बसवराज हा टॉवर वर चढून लोखंडी ब्लेडने( एक्साब्लेड) ने तारांची वायर कापत होता. त्यावेळी तो खाली पडून गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला.
दुर्गम डोंगरात खड्डा खोदला
त्यानंतर त्याचे साथीदार रुपेश आणि सौरभ यांनी त्याचा मृतदेह तेथुन पाबे घाटात आणला. घाटातील मंदिरा समोरच्या दुर्गम डोंगरात खड्डा खोदून त्यात बसवराज याचा मृतदेह गाडून दोघे पसार झाले. बसवराज हा बेपत्ता असल्याची फिर्याद त्याच्या नातेवाईकांनी 23 जुलै रोजी सिंहगडरोड पोलिस ठाण्यात दाखल केली होती. या प्रकरणी सिंहगड पोलिस तपास करणार असल्याचे वेल्हे पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अप्पासाहेब पडळकर यांनी सांगितले.