बीडः शिरूर तालुक्यात एका मांत्रिकाने मध्यस्थीच्या मदतीने काही तरुणांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. एक लाखाचे तीन लाख रुपये करतो, असे अमिष या तरुणांना व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्यात आले. मात्रिकाने सांगितल्याप्रमाणे तरुणांनी (Youngs Cheated) सर्व कृती केली, मात्र तरुणांच्या हाती सोपवण्यात आलेल्या सॅकमध्ये अखेर खेळण्यातल्या नोटा सापडल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी तरुणांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी (Beed Police) एकाला अटक केली आहे.
रायमोहा येथील तरुण असीम ऊर्फ बाबर पठाण यांच्या मोबाइलवर त्याचे चुलते मकसूद नसीर शेख यांनी एक व्हिडिओ पाठवला होता. त्या व्हिडिओत एक मांत्रिक मंत्रांच्या सहाय्याने तिप्पट पैसे करून देत असल्याचे दिसून येत होते. हा व्हिडिओ पाहून असीमचे चुलते मकसूद यांना हे खरे आहे का, असे विचारले. तेव्हा त्यांनीही नगरमधून हा व्हिडिओ आला असून त्यांना विचारून सांगतो, असे म्हटले. मकसूद यांनी काझी सदगरकडे व्हिडिओ सत्यतेबाबत विचारणा केली. तेव्हा काझीने हा व्हिडिओ खरा असून लोहा येथील त्या मांत्रिकाला भेटल्याचे सांगितले. त्यानंतर काझी सदगरचा नंबर मकसूद यांनी असीम पठाणला सोशल मीडियावरून पाठवला. त्यानंतर काझीने असीम आणि संबंधित मांत्रिकाचे कॉन्फरन्स कॉलवर बोलणेही करून दिले. मांत्रिकाने फोनवर पैसे तिप्पट होतात, असे सांगितले. असिमने त्याच्या मित्रांनाही याबाबत सांगितले. तीन मित्रांनी या मांत्रिकाकडून जास्त पैसे मिळवण्यासाठी साडे तीन लाख गोळा केले.
असीम आणि त्याच्या मित्रांना मांत्रिकाने आधी अंबाजोगाई आणि नंतर अहमदपूर येथून सात किमी अंतरावरील एका हॉटेलमध्ये बोलावले. तेथे पोहोचल्यावर एक त्यांनी सांगितल्याप्रमाणे एका मुलाजवळ साडे तीन लाख रुपये दिले. त्यानंतर मुलाने त्यांच्या हाती पैशांची सॅक दिली. मात्र इथेच सॅक उघडू नका, असे सांगण्यात आले. काही वेळाने सॅक उघडून पाहिली असता त्यात खेळण्यातील नोटा आढळून आल्या.
रायमोहा येथील तरुण असिम पठाण याने शिरूर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून शुक्रवारी पहाटे एक वाजता काझी समीर सदगर यांच्यासह पाटील नावाच्या मांत्रिकावर गुन्हा दाखल केला. शिरूर पोलिसांनी या प्रकरणी शेवगावला काझी सदगर याला अटक केली.
इतर बातम्या-