नवी दिल्ली | 23 ऑगस्ट 2023 : राजधानीतील गुन्ह्यांच्या घटना (crime) अद्यापही थांबलेल्या नाहीत. द्वारका परिसरात असाच एक हैराण करणारा प्रकार समोर आला आहे. तिथे एका महिलेने डिलिव्हरी एजंटवर चाकूने (attacked with knife) वार केला. त्याची चूक एवढीच होती की त्याने त्या महिलेला पत्ता विचारला. गेल्या शुक्रवारी द्वारका येथील संपूर्ण घटना जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेत डिलीव्हरी एजंट जखमी झाला आहे.
हैराण करणारी गोष्ट म्हणजे या हल्ल्याचे वृत्त मिळताच पोलिस तेथे आले असता, त्या महिलेने पोलिस पथकातील अधिकाऱ्यांवरही हल्ला केला. याप्रकरणी पोलिसांनी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे.
नक्की काय झालं ?
हे प्रकरण द्वारका सेक्टर-23 येथील आहे. डिलिव्हरी एजंटने महिलेला पत्ता विचारला असता, दोघांमध्ये काही वादावादी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर महिलेने डिलिव्हरी एजंटवर ३ ते ४ वेळा चाकूने हल्ला केल्याचे सीसीटीव्ही फुटेजद्वारे समोर आले आहे. व्हिडीओनुसार, आरोपी महिला एका डिलिव्हरी एजंटजवळून जात होती. त्याने तिला पत्ता विचारण्यासाठी हाक मारली असता ती वेगाने मागे फिरली आणि त्याच्या मानेवर चाकूने वार केला. नंतर तिने त्याच्या स्कूटीची चावी काढून जवळच्याच झुडूपात फेकून दिली.
झाली बाचाबाची
त्यानंतर डिलीव्हरी एजंट स्कूटीवरून खाली उतरला, मात्र त्या महिलेने त्याला जोरात धक्का देऊन खाली पाडले. हे पाहून आजूबाजूचे लोकही घटनास्थळी पोहोचले आणि काही लोकांची गर्दी जमली. या सगळ्यामध्ये महिलेशी वाद सुरू होतो. पण डिलिव्हरी एजंट तिच्याशी बोलण्यासाठी वळताच ती महिला खाली वाकली आणि
तिने त्याच्या स्कूटीच्या टायरवर वार करत ते कापण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिने स्कूटी खाली पाडली आणि आजूबाजूच्या लोकांनाही चाकूचा धाक दाखवला.
पोलिसांवरही केला हल्ल्याचा प्रयत्न
पोलिस घटनास्थळी पोहोचले, मात्र तेव्हाही ती महिला इतरांना चाकू दाखवून धमकावत होती. पोलिसांनी तिच्याकडून चाकू हिसकावून घेतला मात्र तिने तेथील एक छडी घेऊन पोलिसांच्या वाहनावर हल्ल केला तसेच इतर गाड्यांचेही नुकसान केले. पोलिसांनी तिला अटक करण्यााचा प्रयत्न केला असता तिने एका महिला पोलीस अधिकाऱ्याचे केस जोरात खेचले आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. अथक प्रयत्नांनंतर पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, 42 वर्षीय महिला डीडीए फ्लॅटमध्ये भाडेकरू म्हणून एकटीच राहते आणि तिचे शेजाऱ्यांसोबत अनेकदा भांडणे आणि वाद होतात. मात्र तिच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. दरम्यान या हल्ल्यात जखमी झालेल्या डिलीव्हरी एजंटवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.