कानपूर | 6 सप्टेंबर 2023 : लग्न संस्था ही विश्वासावर चालते असं आपण नेहमी म्हणतो. पती-पत्नीच्या नात्यात विश्वास असेल तर विघ्न येत नाहीत. पण या नात्यात थोडाजरी अविश्वासाचा चंचू प्रवेश झाला तर घात झालाच म्हणून समजा. सध्या नात्याला तडा जाण्याची प्रकरणं अधिकच वाढली आहेत. नात्याला तडा जातो तेव्हा काही लोक सामोपचाराने तो प्रश्न सोडवतात. पण सर्वचजण सामंजस्य दाखवणारे नसतात. काही लोक तर जीवावरही उठतात. उत्तर प्रदेशातही अशीच सर्वांना हादरवून सोडणारी घटना घडली आहे. त्यामुळे अख्ख शहरच हादरलं आहे.
उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये ही धक्कादायक घटना गडली आहे. विवाहबाह्य संबंधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मृत व्यक्तीची पत्नी प्रियंका आणि तिचा प्रियकर अनस याला अटक केली आहे. माझा नवरा गुजरातला होता. तोपर्यंत सर्व अलबेल होतं. मला काही अडचण नव्हती. पण नवरा आल्यानंतर प्रियकराला भेटणं शक्य नसल्याचं माझ्या लक्षात आलं. त्यामुळे मी प्रियकराच्या मदतीने नवऱ्याची हत्या केलीय, अशी धक्कादायक कबुली प्रियंकाने दिली आहे.
या महिलेने तिचा पती नितीन पांडे याला तिचा प्रियकर अनसशी झगडा करण्याच्या बहान्याने घराबाहेर पाठवलं. त्यामुळे नितीनही अनसशी भांडायच्या इराद्याने तावातावाने बाहेर पडला. तिकडे अनस दबा धरून बसलेलाच होता. नितीन येताच त्याने संधी साधून नितीनवर हल्ला चढवला. नितीनवर चाकूने वार करून त्याला ठार केले. त्यानंतर त्याचा मृतदेह फेकून पसार झाला. नितीन हा सुरक्षा रक्षक म्हणून गुजरातला काम करतो. त्याला दोन मुले आहेत.
रविवारी ही धक्कादायक घटना उघडकीस आली. त्याचा रक्तबंबाळ मृतदेह नौबस्ता बंबाच्या तीसरी पुलिया येथील गर्द झाडीत सापडला. या घटनेची माहिती तत्काळ नितीनच्या कुटुंबीयांना देण्यात आली. पण त्याच्या कुटुंबीयांनी नितीनची पत्नी प्रियंका आणि तिचा प्रियकर अनसवर खूनाचा आरोप केला होता.
कुटुंबातील लोकांनी या दोघांविरोधात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिसांनी प्रियंकाचे फोन सर्व्हिलान्सवर लावले. त्यानंतर तिला ताब्यात घेऊन तिची कसून चौकशी केली. पोलिसांनी खाक्या दाखवताच प्रियंका पोपटासारखी बोलू लागली. तिने गुन्हा कबूल केला. त्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली. आणि तिच्या प्रियकराच्याही मुसक्या आवळल्या.