वीज पडून महिला ठार; नाशिक जिल्ह्यातल्या शिरवाडे वणी येथील घटना

| Updated on: Oct 09, 2021 | 4:28 PM

नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसासोबत वीजेचे तांडव सुरूच आहे. शनिवारी वीज पडून शिरवाडे वणी येथे शेतात काम करणाऱ्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

वीज पडून महिला ठार; नाशिक जिल्ह्यातल्या शिरवाडे वणी येथील घटना
नाशिक जिल्ह्यात शनिवारी दुपारी वीज पडून विभा महेश गुरव यांचा मृत्यू झाला.
Follow us on

नाशिकः नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसासोबत वीजेचे तांडव सुरूच आहे. शनिवारी वीज पडून शिरवाडे वणी येथे शेतात काम करणाऱ्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. विभा महेश गुरव असे मृत महिलेचे नाव आहे.

जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून वीजेचे तांडव सुरू आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार वादळी पाऊस होत आहे. आज शनिवारी दुपारीही शिरवाडे वणी परिसरात वादळी पावसाला सुरुवात झाली. त्यात विभा गुरव या शेतात काम करत होत्या. यावेळी अचानक वीज कोसळल्याने विभा यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी त्र्यंबक तालुक्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडली. त्यात पहिल्या घटनेत चंद्राची मेट येथे रामू रामचंद्र चंद्रे हे तरुण शेतकरी (वय 38) रानात गुरे चारत होते. दुपारी त्यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत तालुक्यातील सामुंडी येथे एका झाडावर वीज कोसळली. या झाडाजवळच्या घरातील रंजना वसंत लोमटे (वय 45) व त्यांच्या तीन मुली व मुलगा यांना वीजेचा जबर झटका बसला. त्यात रंजना थोडावेळ बेशुद्ध पडल्या. तर त्यांची नऊ वर्षांची मुलगी छायाला रुग्णालयात दाखल करावे लागले. तिची एक बाजू पूर्णतः बधीर झाली आहे, तर इतर दोन मुली अपेक्षा (वय 14) आणि अक्षरा (वय 11) यांच्या हाताला झटका पडून बेशुद्ध पडले. मात्र, त्यांची प्रकृती ठीक आहे. तिसऱ्या घटनेत अंबई माळरानावर वीज पडली. या घटनेत येथे चरणाऱ्या दहा शेळ्या जागीच ठार झाल्या. सुनील भुतांबरे यांच्या या शेळ्या होत्या.

दरम्यान, सध्या वायव्य भारतात मान्सूनच्या परतीसाठी अनुकूल परिस्थिती आहे. त्यामुळे या काळात नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कुलाबा वेधशाळेनुसार 9 ऑक्टोबर रोजी उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दुसरीकडे शाहीन वादळाचा शनिवारी (9 ऑक्टोबर) आणि रविवारी (10 ऑक्टोबर) उत्तर महाराष्ट्राला जबर तडाखा बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात परतीच्या पावसाचे 16 ते 18 ऑक्टोबर आणि राजस्थानमध्ये 13 ते 14 ऑक्टोबर दरम्यान आगमन होण्याची शक्यता आहे. मात्र, मध्य व दक्षिण भारतात मान्सून आणखी काही दिवस सक्रिय राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात पुन्हा 19 आणि 20 ऑक्टोबर रोजी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जवळपास 25 ऑक्टोबर नंतर पावसाळी वातावरण हटण्याचा अंदाज आहे.

इतर बातम्याः

कृषिमंत्री दादा भुसे यांच्या मुलाच्या उपस्थितीत अल्पवयीन मुलीचं लावलं लग्न; भाजप नेत्या चित्रा वाघ यांची कारवाईची मागणी

शिवारतुंबव्या पावसाचे नाशिकमध्ये थैमान; गोडबार छाटणीपूर्वीच द्राक्षबागांवर नांगर, पिकांचा चिखल अन् शेताचे तळे!

नाशिकमध्ये साहित्य संमेलन होणारच; नोव्हेंबरच्या तारखांची चाचपणी