वॉशिंग्टन : एक महिला गेल्या वर्षभरापासून आपल्या पतीची हत्या करणाऱ्याला पोलिसांनी अटक करावी, अशी मागणी करत वारंवार टीव्हीसमोर येऊन आक्रोश करत होती. ती या मागणीसाठी अनेकदा वृत्तवाहिन्यांवर झडकली. पण आपल्या पतीचा हत्या करणाऱ्याचा शोधच लागत नसल्याचं ती म्हणत होती. दुसरीकडे याच प्रकरणाचा तपास करत असणाऱ्या पोलिसांना मात्र तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. पतीची हत्या करणाऱ्या मारेकऱ्याला शोधून काढण्याची मागणी करणाऱ्या पत्नीनेच आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केली, अशी माहिती पोलिसांना तपासातून मिळाली आहे. त्यामुळे जगभरात या प्रकरणाची चर्चा होतेय.
जेनिफर लिन फेथ असं आरोपी महिलेचं नाव आहे. जेनिफरनेच आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केली. संबंधित हत्येची घटना ही गेल्यावर्षी 9 ऑक्टोबरला घडली होती. पण आरोपी महिला पोलिसांना चकवा देत होती. आपल्या पतीच्या निधनाने आपल्यावर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे, असं नाटक ती पोलिसांसमोर करत होती. विशेष म्हणजे ती न्यूज टीव्ही चॅनल समोर येऊन रडण्याचं नाटक करुन आपल्या पतीच्या मारेकऱ्याला पोलिसांनी लवकर अटक करावी, अशी मागणी करायची. “ज्याने कुणी मला वयाच्या 48 व्या वर्षी विधवा बनवलं त्याला मला जेलमध्ये बघायचं आहे”, असं ती म्हणायची. त्यामुळे इतर नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात होती.
हत्येच्या दिवशी जेनिफर आपल्या पती जेमी थेम यांच्यासोबत टेक्सास येथील आपल्या घरातून बाहेर पडली होती. दोघे पती-पत्नी आपल्या पाळीव कुत्र्याला घेऊन वॉकिंगसाठी घराबाहेर पडले होते. या दरम्यान जेनिफरचा प्रियकर तिथे आला. तिथे दोघांनी मिळून जेमी थेम यांची हत्या केली. त्यानंतर जेनिफरने रडण्याचं नाटक करत आकाडतांडव केला. तसेच आज्ञात व्यक्ती आपल्या पतीची हत्या करुन पळून गेला, अशी माहिती तिने पोलीस आणि स्थानिकांना दिली.
पोलिसांनी केलेल्या तपासात अनेक गोष्टींचा उलगडा झाला आहे. जेनिफरचा प्रियकर तिच्याबाबत खूप संवेदनशील होता. याच गोष्टीचा फायदा घेऊन तिने त्याला चुकीची माहिती दिली होती. आपला पती आपल्याला खूप त्रास देतो, अशी खोटी माहिती तिने दिली होती. त्यानंतर तिने प्रियकरासोबत पतीच्या हत्तेचा कट रचला होता, अशी माहिती पोलीस तपासात उघड झाली.
एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जेनिफर आणि तिच्या प्रियकराने तिच्या पतीची हत्या केल्याचे अनेक पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. पण दुसरीकडे तिच्या वकिलाने कोर्टात तिच्या विरोधात काही ठोस पुरावे नसल्याचा दावा केला आहे. तसेच पोलीस जाणीवपूर्वक तिला फसवत आहेत, असा आरोप तिच्या वकिलाने केला आहे. या प्रकरणात महिलेवरचा आरोप कोर्टात सिद्ध झाला तर तिला अजीवन कारावास किंवा मृत्यूदंडाची शिक्षा होऊ शकते.
हेही वाचा :
लग्नानंतर अवघ्या 10 दिवसांनी नवरी आठ महिन्यांची गरोदर, नवरदेवाच्या पायाखालची जमीन सरकरली