बंगळुरु : नुकतीच एक खळबळजनक घटना घडली. मोठ्या हुद्दयावर असलेल्या वरिष्ठ महिला सरकारी अधिकाऱ्य़ाची हत्या करण्यात आली. आरोपीने घरात घुसून केएस प्रतिमाची हत्या केली होती. केएस प्रतिमा या कर्नाटक सरकारमध्ये वरिष्ठ अधिकारी होत्या. सोमवारी या प्रकरणी बंगळुरु पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं. आरोपीच नाव किरण आहे. तो कर्नाटक सरकारमध्ये कंत्राटी कर्मचारी होता. प्रतिमा यांनी किरणला काही दिवसांपूर्वी नोकरीवरुन बर्खास्त केलं होतं. तो राग किरणच्या मनात होता. त्याचा रागातून त्याने केएस प्रतिमाची हत्या केली.
प्रतिमा यांची हत्या करुन किरण चामराज नगर जिल्ह्यात पळून गेला होता. सोमवारी त्याला तिथून अटक करण्यात आली. “प्रतिमा हत्या प्रकरणात एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे. दक्षिण बंगळुरुचे डीसीपी यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात आली. माली महाडेश्वर हिल्स येथून आरोपीला ताब्यात घेतलं. आरोपी ड्रायव्हरचे काम करायचा, त्याला 7 ते 10 दिवसांपूर्वी कामावरुन काढून टाकण्यात आलं होतं” अशी माहिती बंगळुरुचे पोलीस आयुक्त बी.दयानंद यांनी दिली.
खात्यामध्ये एक प्रतिष्ठा होती
“किरण कॉन्ट्रॅक्टवर होता व त्याला काही दिवसांपूर्वी नोकरीवरुन काढून टाकल्याच आम्हाला समजलं” असं दयानंद यांनी सांगितलं. प्रतिमा यांच्याबद्दल बोलताना त्यांच्या कुटुंबातील सदस्याने सांगितलं की, “त्या हिम्मतवान, धडाडीच्या महिला अधिकारी होत्या. छापा टाकणं असो किंवा अन्य कारवाई त्यांची खात्यामध्ये एक प्रतिष्ठा होती, दरारा होता. अलीकडेच त्यांनी काही ठिकाणी छापेमारीची कारवाई केली”. प्रतिमा यांनी काम करुन आपली ओळख बनवली होती.
एमएससीची डिग्री
37 वर्षाच्या केएस प्रतिमा या खाण आणि भूविज्ञान खात्याच्या उपसंचालक होत्या. 5 नोव्हेंबरला रविवारी आरोपी त्यांच्या घरात घुसला. त्याने भोसकून त्यांची हत्या केली. प्रतिमा यांनी शिवमोगामधून एमएससीची डिग्री घेतली होती. मागच्या दीड वर्षापासून त्या बंगळुरुत कार्यरत होत्या.