नवी दिल्ली : मोबाईलची स्क्रिन तुटल्यानंतर विमा कंपनीकडून पैसे मिळावे यासाठी महिलेने प्रचंड शक्कल लढवली. मात्र, विमा कंपनीच्या निकषात ते बसत नसल्याने विमा कंपनीकडून मोबाईलची भरपाई मिळाली नाही. त्यामुळे नाराज झालेल्या महिलेने विमा कंपनीकडून नवा मोबाईल मिळावा यासाठी विचित्र कट आखला. काही लोकांनी तिच्या हातून मोबाईल हिसकावून नेला, अशी तक्रार तिने पोलिसात दिली. मात्र, पोलिसांनी तिचा कट उधळून लावला. हा सर्व प्रकार नेमका कसा झाला, त्याचा संपूर्ण घटनाक्रम आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
नेमकं प्रकरण काय ?
संबंधित विचित्रप्रकार हा दिल्लीच्या शाहदरा जिल्ह्यातील आहे. या जिल्ह्यातील एका महिलेने काही महिन्यांपूर्वी एक महागडा मोबाईल विकत घेतला. मोबाईल महाग असल्याने तिने मोबाईलचा विमा देखील काढला. मात्र, त्यानंतर एका दिवशी तिच्याकडून चुकून मोबाईलची स्क्रीन तुटली. मोबाईलची किंमत जास्त असल्याने तिने तो मोबाईल बनवला नाही. याशिवाय मोबाईलचा विमा काढला असल्याने विमा कंपनीकडून खर्च वसूल करावा, असं तिच्या मनात आलं.
विमा कंपनीचा पैसे देण्यास नकार
महिलेने क्लेमचा दावा ठोकला. विमा कंपनीने सर्व माहिती घेतली तेव्हा महिलेच्या सांगण्यात काहीतरी गडबड असल्याचा संशय कंपनीला आला. त्यामुळे त्यांनी क्लेमचे पैशे देण्यास नकार दिला. त्यानंतर ती महिला विमा कंपनीच्या मागे लागली. विमा कंपनी आपल्याला पैसे देणार नाही हे महिलेला माहिती पडली तेव्हा तिने दुसरा काहीतरी मार्ग अवलंबण्याचं ठरवलं.
महिलेची पोलिसात धाव
महिलेने त्यानंतर पोलीस ठाण्यात जाऊन आपला मोबाईल चोरी झाल्याची तक्रार केली. मोबाईल चोरी झाल्याचं सिद्ध झालं तर विमा कंपनीला मोबाईलचे पूर्ण पैसे द्यावे लागतील, असं महिलेला वाटलं. महिलेने पोलिसांना घरी बोलावून तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी महिलेच्या मोबाईलचा ईएमआय नंबर ट्रेसला लावला. पोलिसांनी तपासही सुरु केला.
महिलेचं कारस्थान उघड
पोलीस तक्रारीच्या दोन महिन्यांनंतर महिलेला वाटलं, पोलीस आणि विमा कंपनी हा सर्व प्रकार विसरले असतील. त्यामुळे महिलेने मोबाईलमध्ये सीम टाकलं. सीम टाकताच तो फोन कोणत्या भागात आहे त्याची माहिती पोलिसांच्या कंट्रोल रुममध्ये ट्रेस झाली. त्यानंतर पोलीस थेट महिल्या घरी पोहोचले. पोलिसांनी महिलेची कसून चौकशी केली. त्यानंतर तिने आपली चूक मान्य केली.
हेही वाचा : ‘ते माझ्यासोबत फ्लर्ट करायला लागलेले’, लालूंच्या मुलाखतीनंतर पाकिस्तानी अँकरची प्रतिक्रिया, वाचा सविस्तर