डोंबिवली : डोंबिवलीत मॉर्निग वॉक करणाऱ्या वृध्द महिलेचा चोरट्याने गळा दाबून मंगळसूत्र लंपास केल्याची घटना सोमवारी सकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी विष्णुनगर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या चोरट्याला 12 तासांच्या आत डोंबिवलीतून अटक केली आहे. कानू वघारी असे या चोरट्याचे नाव आहे. पत्नीचे ऑपरेशन झाल्याने त्याच्याजवळील सगळे पैसे खर्च झाले होते. या आर्थिक विवंचनेतून त्याने ही चोरी केल्याची माहिती पोलिसांना दिली. आरोपीकडून चोरीला गेलेल्या मंगळसूत्र देखील पोलिसांनी हस्तगत केले आहे.
डोंबिवली पश्चिमेकडील देवी चौक परिसरात सोमवारी सकाळच्या सुमारास एक 85 वर्षीय वृद्ध महिला मॉर्निंग वॉक करत होती. यादरम्यान एक चोरटा तिचा पाठलाग करत होता.
काही अंतर गेल्यानंतर रस्त्यावर कुणीही नसल्याची संधी साधत या चोरट्याने वृद्ध महिलेचे तोंड आणि गळा दाबून तिला जमिनीवर पाडले. त्यानंतर तिच्या गळ्यातील 40 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला.
या घटनेत जखमी झालेल्या वृद्ध महिलाने याप्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही तपासले.
एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक तरुण या महिलेचा पाठलाग करत असल्याचा दिसून आलं. पोलिसांनी या तरुणाचा शोध सुरू केला. याच दरम्यान सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा तरुण या परिसरात राहणारा असावा असा संशय पोलिसांना होता.
पोलिसांनी या परिसरात शोध सुरू केला. गुप्त माहितीनंतर 12 तासांच्या आत पोलिसांनी या चोरट्याला डोंबिवलीतून त्याच्या घरी जाऊन अटक केली.
काही महिन्यांपूर्वी आरोपीच्या पत्नीचे ऑपरेशन झाले होते. या ऑपरेशनमध्ये त्याच्याजवळील सर्व पैसे खर्च झाले, त्यामुळे तो आर्थिक विवंचनेत होता. या आर्थिक विवंचनेतून त्याने चोरीचा मार्ग पत्करल्याचे समोर आले.
सध्या पोलिसांनी या आरोपीकडून चोरीला गेलेले 40 हजाराचे मंगळसूत्र हस्तगत केले आहे. या आरोपीने याआधी अजून कुठे चोरी केली आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत.