जळगाव : पाचोरा तालुक्यातील सारोळा येथे अंधश्रद्धेला बळी पडल्यामुळे धक्कादायक घटना घडलीय. गायीवर करणी केल्याने तिचा मृत्यू झाला असा संशय बाळगून एका महिलेला ओल्या वस्त्रानिशी मंदिरात पाणी घालायला लावण्यात आलंय. या धक्कादायक प्रकारानंतर पाचोरा पोलिसात पीडितेच्या दीरासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अंधश्रद्धेला बळी पडू नका असे अनेक सामाजिक संस्था तसेच राज्य सरकारकडून सांगितले जाते. त्यासाठी राज्यात कठोर कायदेदेखील करण्यात आले आहेत. असे असताना जळगावात ही घटना घडलीय.
मिळालेल्या माहितीनुसार सारोळा येथे रमेश धोंडू पाटील व पत्नी रंजनाबाई वास्तव्यास आहेत. गायीवर करनी केल्याच्या संशयावरुन दीर देवीदास धोंडू पाटील यांच्यासह इतर ग्रमास्थ रंजनाबाई यांच्या घरासमोर आले. त्यांनी रंजनाबाई यांना शिवीगाळ केली. तसेच त्यांचे पती रमेश धोंडू पाटील आणि खुद्द रंजनाबाई यांच्या अंगावर पाणी टाकण्यात आले. या दोघांनाही अंगावरच्या ओल्या कपड्यानिशी देवाच्या मूर्तीवर पाणी टाकायला लावण्यात आले. जादू टोण्यातून हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे.
याप्रकरणी रंजनाबाई यांचे दीर देवीदास पाटील, मंगलाबाई पाटील, गणेश देवीदास पाटील, ज्योती देवीदास पाटील, अनिल देवीदास पाटील यांच्याविरोधात पाचोरा पोलिसात जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी घटनेला दुजोरा दिलेला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यामुळे पालीस पुढचा तपास करत आहेत.
दरम्यान, या प्रकारामुळे जळगाव जिल्ह्यातील सारोळा पंचक्रोशीत एकच चर्चा सुरु आहे. करणीसारख्या काल्पनिक प्रकाराचा आधार घेत एका महिलेला त्रास देणे चुकीचे असल्याची भावना व्यक्त होतोय.
इतर बातम्या :