कल्याण / सुनील जाधव : स्मार्ट सिटीचे काम सुरु असतााना पिलरवरुन पडून एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. पिंटू राधेश्याम कुशवाह असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी ठेकेदारावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. स्मार्ट सिटी अंतर्गत कल्याण स्टेशन परिसरातील पिलर क्रमांक 13 चे काम सुरू असताना एका कामगाराचा पडून मृत्यू झाल्याची घटना कल्याण येथे घडली आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची स्मार्ट सिटी अंतर्गत गेले अनेक दिवसांपासून विविध ठिकाणी कामे सुरू आहेत. या कामासाठी अनेक ठिकाणी ठेकेदार नेमण्यात आले आहेत. मात्र हे ठेकेदार कामगारांच्या सुरक्षेबाबत निष्काळजीपणा करत असल्याचे दिसून येते.
कल्याण स्मार्ट सिटीअंतर्गत कल्याण गेस्ट हाऊससमोर काम सुरू आहे. पिलर क्रमांक 13 येथे रात्रीच्या वेळी काम करत असताना त्याच्या हातातून मेजरमेंट टेप सुरक्षा जाळीवर पडली. त्यानंतर मयत पिंटू सुरक्षा जाळी असल्याने बिनधास्तपणे त्या जाळीवर चालत टेप उचलण्यास गेला.
मात्र जाळी एका ठिकाणी फाटलेली असल्याने पिंटूचा तोल जाऊन तो जवळपास 15 ते 20 फूट उंचीवरून खाली कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. दरम्यान त्याच्या मृत्यूस ठेकेदार प्रेम शंकर सुंदर प्रसाद हा जबाबदार असल्याने पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.