न्यूयॉर्क (अमेरिका) : प्रेमामध्ये भांडणं होतात. त्यात विरह किंवा प्रेमभंगही असतो. बऱ्याचदा प्रेम संबंधात असताना अनेकांचं जमत नाही, त्यांची घुसमट होते म्हणून अनेक जोडपी वेगळं होण्याचा निर्णय घेतात. त्याप्रमाणे ते वेगळे होऊन स्वतंत्र आयुष्यही जगतात. पण काही विचित्र आणि विकृत माणसं आपल्या पूर्व प्रेयसी किंवा प्रियकराला जीवे मारण्याचा प्रयत्न करतात. असाच काहिसा प्रकार अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातून समोर आला आहे. एका 26 वर्षीय तरुणाने त्याच्या 24 वर्षीय एक्स-गर्लफ्रेंडची अमानुषपणे हत्या करत तिचा लॅपटॉप आणि पैसे चोरले. या प्रकरणी कोर्टाने आरोपीला 30 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे या घटनेची दखल जगभरातील माध्यमांनी घेतली आहे.
संबंधित घटना ही न्यूयॉर्कच्या क्वींस भागात घडली आहे. आरोपी तरुणाचं जेवियर ड सिल्वा रोजास असं नाव आहे. तर मृतक तरुणीचं वॅलेरी रेयेस असं नाव आहे. खरंतर जेवियर आर्णि वॅलेरी हे चांगले मित्र होते. मात्र काही दिवसांपूर्वी ते अचानक वेगळे झाले. त्यांच्यात काही मुद्द्यांवरुन मतभेद झाले असावेत, असा अंदाज त्यांच्या मित्र-मैत्रिणींना होता. या दरम्यान, एकेदिवसी जेवियर हा वॅलेरीच्या घरी दाखल झाला. तिथे त्यांच्यात कडाक्याचं भांडण झालं.
भांडणादरम्यान जेवियरने वॅलेरीच्या डोक्यावर जोराने हल्ला केला. या हल्ल्यात वॅलेरी गंभीर जखम झाली. तसेच तिच्या चेहऱ्यावरही जखम झाली. पण जेवियरचं तेवढ्यावर मन शांत झालं नव्हतं. त्याने वॅलेरी रक्तबंबाळ असताना तिचे हात-पाय बांधले आणि तिच्या तोंडाला टेप चिकटवला. तिला जिवंत असताना सुटकेसमध्ये टाकलं. त्यानंतर त्या सुटकेसला घेऊन तो गाडीने शहारापासून 20 किमी लांब गेला. त्याने कनेक्टिकटजवळ जंगलात ती सुटकेस फेकून दिली. या दरम्यान सुटकेसमध्ये श्वास कोंडल्याने वॅलेरीचा आधीच मृत्यू झाला होता.
दरम्यान, वॅलेरीच्या कुटुंबियांनी तिचा शोध सुरु केला. सलग दोन दिवस वॅलरीचा कुठेच पत्ता लागत नसल्याने तिच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर एक आठवड्याने जंगलात एका सुटकेसमध्ये मुलीचा मृतदेह आढळला. पोलिसांनी केलेल्या तपासात तो मृतदेह हा वॅलेरीचाच असल्याचं निषपन्न झालं.
पोलिसांनी वॅलरीच्या मृत्यूप्रकरणी तपास सुरु केला. तपासादरम्यान आरोपीने वॅलरीची हत्या करण्याआधी तिचा लॅपटॉप आणि डेबिट कार्ड चोरलं होतं. तसेच तिच्या बँक खात्यातून 4 लाख रुपये काढल्याची माहिती तपासात समोर आली. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या फुटेज आणि इतर तांत्रिक गोष्टींच्या आधारे जेवियरला संशयित आरोपी म्हणून अटक केली. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबुल केला. याप्रकरणी त्याला कोर्टात हजर केले असता कोर्टाने जेवियरला 30 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.
हेही वाचा :
सातारा परिसरात दिवसाढवळ्या घरं फोडली, लोको पायलट आणि इंजिनिअरच्या घरात चोरी, सीसीटीव्हीत चोरटे कैद