चंदिगड : हरियाणाच्या रोहतक येथून प्रचंड भयानक घटना समोर आली आहे. एका तरुणाने पैसे आणि संपत्तीच्या मोहापाई चक्क रक्ताचं नातं असलेल्या आई-वडील, बहीण आणि आजीची हत्या केल्याचं उघड झालं आहे. विशेष म्हणजे संबंधित घटनेचा उलगडा झाल्यानंतर पोलीसही चक्रावले. पोलीस गेल्या अनेक दिवसांपासून या प्रकरणाचा तपास करत होते. पण या प्रकरणाचा उलगडा होत नव्हता. अखेर पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी रोहतकमध्ये एकाच कुटुंबातील चार जणांची हत्या झाल्याची माहिती समोर आली होती. आरोपींनी घरात घुसून कुटुंबप्रमुख प्रदीप मलिक त्यांच्या पत्नी, आई आणि मुलीची गोळ्या झाडून हत्या केली. हत्येच्या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे हल्ल्यावेळी मलिक कुटुंबातील एक व्यक्ती घरात नव्हती. ती व्यक्ती म्हणजे प्रदीप मलिक यांचा मुलगा अभिषेक. अभिषेक काही कामानिमित्ताने बाहेर गेला होता.
हत्येच्या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी पोलिसांना बोलावून याबाबत माहिती दिली होती. आरोपी अभिषेक याने पोलिसांसमोर शोक व्यक्त करण्याचं नाटक केलं होतं. पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. पण पोलीस या प्रकरणाचा उलगडा करण्यात अपयशी ठरत होते. त्यामुळे पोलिसांनी अनेक बाजूंनी विचार केला. पण तरीही पोलीस अपयशी ठरत होते.
या दरम्यान पोलिसांना मलिक कुटुंबात जिवंत राहिलेला एकमेव सदस्य अभिषेकवर संशय आला. त्यामुळे त्यांनी अभिषेकला ताब्यात घेतलं. त्याची कसून चौकशी केली असता तो उडावउडवीचे उत्तर देऊ लागला. अखेर पोलिसांनी त्याला पोलीसी खाक्या दाखताच तो बोलायला लागला. त्याने आपला गुन्हा कबूल केला.
अभिषेकच्या वडीलांनी मुलगी नेहाच्या नावावर सर्व संपत्ती केली होती. याच गोष्टीचा राग त्याला आला होता. आई-वडिलांनी बहिणीच्या ऐवजी आपल्या नावावर संपत्ती करायला हवी होती, अशी त्याची इच्छा होती. याशिवाय गेल्या काही दिवसांपासून त्याचं कुटुंबियांसोबत क्षुल्लक कारणांवरुन भांडण व्हायचं. त्यामुळे त्याने आपल्या मित्रांसोबत मिळून थेट कुटुंबियांनाच संपवण्याचा कट आखला.
त्यानुसार अभिषेक घरात नसताना हल्लेखोर घरात घुसले. त्यांनी घरातील सर्व सदस्यांच्या डोक्यात गोळी झाडून ठार केलं. यावेळी अभिषेकची आजी, आई-वडील यांचा जागीच मृत्यू झाला. तर बहीण नेहा गंभीर जखमी झाली. तिला एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. पण त्यादरम्यान तिचा मृत्यू झाला.
हेही वाचा :
बेलफुल वाटणाऱ्या आजी अचानक बेपत्ता, दोन दिवसांनी ऊसाच्या शेतात मृतदेह, यवतमाळमध्ये खळबळ