मुंबई: अकरावीचा कट ऑफ वाढेल (जास्त असेल) असा अंदाज वर्तविला जात होता. यंदा 100 टक्के, 99 टक्के मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्याने हा अंदाज वर्तविण्यात येत होता. काल अकरावीची पहिली यादी (11th Admission First List) प्रसिद्ध झाली या यादीनुसार अकरावीचा कट ऑफ (Cut Off) घसरल्याचं दिसून आलंय. अकरावीत प्रवेश घेताना आपल्या सर्वात आवडत्या महाविद्यालयात प्रवेश मिळावा अशी प्रत्येक विद्यार्थ्याची इच्छा असते. यंदा मुंबईतील 61 हजार 634 विद्यार्थ्यांची ही इच्छा पूर्ण झाली आहे. त्यांना त्यांचे पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे. अकरावी प्रवेशाची पहिली यादी नुकतीच जाहीर झाली. पहिल्याच यादीत 1 लाख 39 हजार 652 विद्यार्थ्यांचा त्यांनी निवड केलेल्या महाविद्यालयामध्ये (Junior College Admission) प्रवेश पक्का झाला आहे.
विद्यार्थ्यांनी दिलेले महाविद्यालयाचे प्राधान्यक्रम, महाविद्यालयाचा गतवर्षीचा कट ऑफ आणि दहावीला मिळालेले गुण यांची सांगड घालून अकरावीची प्रवेश यादी जाहीर केली जाते. मुंबई महानगरात केंद्रीय प्रवेश प्रक्रियेसाठी 2 लाख 30 हजार 981 जागा उपलब्ध आहेत. पहिल्या फेरीत 2 लाख 37 हजार 262 विद्यार्थ्यांचे अर्ज पात्र ठरले होते. पहिल्या फेरीत महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना 6 ऑगस्टपर्यंत त्या महाविद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करणे बंधनकारक असणार आहे. अन्यथा त्यांना प्रवेश प्रक्रियेतून बाहेर काढले जाईल.
प्रवेशावेळी विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयांचा पसंतीक्रम घेण्यात आला होता. दुसऱ्या पसंतीक्रमापासून महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी पुन्हा पुढील फेरीत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. त्या फेरीनंतर रिक्त राहणाऱ्या जागा पुढील फेरीसाठी उपलब्ध असणार आहेत.
मुंबई महानगर क्षेत्रात 2 हजार 76 महाविद्यालयांमध्ये अल्पसंख्याक, संस्थांतर्गत आणि व्यवस्थापन कोट्यातील मिळून एकूण 1 लाख 40 हजार 805 जागा उपलब्ध आहेत. 14 हजार 892 विद्यार्थ्यांनी आतापर्यंत कोट्यांतर्गत प्रवेश निश्चित केला असून 1 लाख 25 हजार 402 जागा रिक्त आहेत.