मुंबई: अकरावीचा कट ऑफ (11th Cut Off) वाढेल (जास्त असेल) असा अंदाज वर्तविला जात होता. यंदा 100 टक्के, 99 टक्के मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्याने हा अंदाज वर्तविण्यात येत होता. काल अकरावीची पहिली यादी प्रसिद्ध झाली या यादीनुसार अकरावीचा कट ऑफ घसरल्याचं दिसून आलंय. गतवर्षीच्या तुलनेत नामवंत महाविद्यालयातील अकरावी प्रवेशाच्या कटऑफमध्ये 2 ते 4 टक्क्यांपर्यंत घसरण झाली असून, पहिल्या यादीत नव्वद प्लस तसेच 85 ते 90 टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांनाच बहुतांश महाविद्यालयात प्रवेश (Junior College Admissions) मिळाले आहेत. गतवर्षी मूल्यमापनावर आधारित निकाल लागला होता. त्यामुळे पहिल्या यादीत नामवंत महाविद्यालयांनी 95 टक्यांचा आकडा पार केला होता. यंदा लेखी परीक्षा (Written Exams) झाल्या आणि निकाल लागला यामुळे याचा थेट परिणाम पहिल्या यादीवर दिसला.
70 ते 80 टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांनी नामवंत महाविद्यालयांचा पसंतीक्रम दिल्याने वरच्या पसंतीक्रमानुसार अनेकांना महाविद्यालय मिळालेले नाही. सेंट झेवियर्स महाविद्यालयातील कला शाखेतील कट ऑफने 94 टक्क्यांचा तर एचआर महाविद्यालयाची वाणिज्य शाखेत 93 टक्के आकडा पार केला. रुईयाचा विज्ञान शाखेचा कटऑफ 92.40 वर थांबला आहे. तर बहुतांश नामवंत महाविद्यालयांचा कटऑफ नव्वदी पार केला आहे काही ठिकाणी 90 टक्केच्या खाली घसरला आहे.
अकरावीची प्रवेश प्रक्रिया अखेर महत्त्वाच्या टप्प्यात आलीये. मजल दरमजल करत अकरावीचे विद्यार्थी आता कट ऑफ लिस्ट पर्यंत आलेले आहेत. 11 वीची पहिली कट ऑफ लिस्ट जाहीर झालीये. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही स्कॉलर्स मुलांचा ओढा सायन्स ऐवजी आर्ट्स शाखेकडेच असल्याचा पाहायला मिळतोय. स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी स्कॉलर्स मुलं आत्तापासून आर्ट्स शाखेत प्रवेश घेत आहेत.
अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी काल, बुधवारी सकाळी जाहीर करण्यात आली. अकरावीच्या पहिल्या यादीत 2 लाख 37 हजार 268 विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 1 लाख 39 हजार 651 विद्यार्थ्यांना पहिल्या यादीचे अलोटमेंट करण्यात आले आहेत. पहिली पसंती दिलेले महाविद्यालय 61 हजार 735 विद्यार्थ्यांना मिळाले आहे. यामुळे या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावे लागणार आहेत. अन्यथा पुढील एका फेरीसाठी ते प्रतिबंधित असणार आहेत.