जर तुम्हाला अंतराळ आणि त्याच्याशी संबंधित विषयांमध्ये रस असेल. हवामान बदल, खगोलशास्त्र यांसारख्या विषयांचा अभ्यास करायचा असेल तर त्याचा अभ्यास करण्याची चांगली संधी आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, इंदूर (IIT Indore) ने नवीन बीटेक अभ्यासक्रम सुरू केला आहे. हा अभ्यासक्रम बीटेक इन स्पेस सायन्स अँड इंजिनीअरिंग असा आहे. जाणून घेऊया या कोर्समध्ये प्रवेश कसा घ्यायचा, किती जागांवर प्रवेश मिळणार आणि करिअरमध्ये काय स्कोप असणार आहे.
अंतराळ विज्ञान आणि अभियांत्रिकीमध्ये विद्यार्थ्यांना हवामान बदलाचा अभ्यास आणि अंदाज वर्तविण्यास शिकवले जाईल. विद्यार्थ्यांना कम्युनिकेशन, नेव्हिगेशन, डिफेन्स, सिक्युरिटी, सर्व्हे,ॲग्रीकल्चर, एन्व्हायर्नमेंट, इकोलॉजी आणि खगोलशास्त्र शिकवले जाणार आहे. जर तुम्हाला अंतराळ आणि खगोलशास्त्राची आवड असेल तर हा कोर्स तुमच्यासाठी परफेक्ट आहे.
या अभ्यासक्रमाला प्रवेश जेईई ॲडव्हान्स्डच्या गुणांवर आधारित असेल. देशातील कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्डातून विद्यार्थी बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. जेईई परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमालाही प्रवेश घेण्याचा पर्याय आहे.
स्पेस सायन्स अँड इंजिनीअरिंगमध्ये बीटेक करणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचा पर्याय असेल, त्यांना स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये संशोधन करता येणार आहे. त्यांना सरकारी आणि खासगी क्षेत्रातील अंतराळ तंत्रज्ञान प्रकल्पांवर काम करण्याचा पर्याय असेल.