चेन्नई: अभियांत्रिकी (Engineering) अभ्यासक्रमाचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद म्हणजेच एआयसीटीईनं (AICTE) मोठी घोषणा केली आहे. अभियांत्रिकीच्या आर्किटेक्चर, बायोटेक्नॉलॉजी आणि फॅशन टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बारावीमध्ये गणित (Maths) विषयाचं अध्ययन करणं वैकल्पिक असेल. एआयसीटीईनं 2022-23 साठी या मार्गादर्शक सूचना जारी केल्या आहेत. याशिवाय कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरींगचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना केमिस्ट्री विषय वैकल्पिक करण्यात आला आहे. अभियांत्रिकीचे डिप्लोमा आणि पदवी अभ्यासक्रमांच्या 29 पैकी 10 अभ्यासक्रमांमधून गणित विषय वैकल्पिक करण्यात आला आहे. यामुळं अभियांत्रिकी अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
अभियांत्रिकीच्या 10 अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी आता गणित विषय सक्तीचा असणार नाही कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान, जीवशास्त्र, बायो टेक्नॉलॉजी, टेक्निकल वोकेशनल सब्जेक्ट, कृषी, अभियांत्रिकी ग्राफिक्स, इन्फॉर्मेटिक्स प्रॅक्टिसेस, बिझनेस स्टडीज, आंत्रप्रुनरशीप या अभ्यासक्रमांना बारावीला गणित विषय नसला तरी प्रवेश घेता येईल.
एआयसीटीईनं 2021-22 मध्ये अभियांत्रिकी अभ्यासक्रमांमध्ये गणित आणि भौतिकशास्त्र हे विषय वैकल्पिक करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यांच्या टीकेची झोड उठली होती. यानंतर या वर्षापासून सुरु होणाऱ्या अभ्यासक्रमांसाठी एआयसीटीईनं एक पाऊल मागं जाण्याचा निर्णय घेतला आहे.
अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेनं अभियांत्रिकी प्रवेशासाठी भौतिकशास्त्र, गणित आणि रसायनशास्त्र हे वैकल्पिक करण्यावरुन नाराजी व्यक्त केली आहे. अभियांत्रिकीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा पाया चांगला असावा म्हणून हे विषय आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मात्र, नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू करण्यात आल्यानंतर हा बदल करण्यात आला आहे. यापूर्वी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेनं भारतातील प्रादेशिक भाषेत अभियांत्रिकी शिक्षण सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. प्रादेशिक भाषेतील अभियांत्रिकी प्रवेशाला देखील विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र आहे.