भोपाळ: आता तुम्हीही हिंदीतून शिकून डॉक्टर (doctor) होऊ शकता. त्यासाठी इंग्रजीला घाबरण्याचं कारण नाही. तुम्ही हिंदीमध्ये एमबीबीएसचं शिक्षण घेऊ शकता. त्यासाठी स्वत: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा एमबीबीएसचा अभ्यासक्रम तयार करणार आहेत. मात्र, हिंदीतून एमबीबीएस (MBBS) होण्याची संधी फक्त मध्यप्रदेशातच मिळणार आहे. कारण मध्यप्रदेश सरकारने हिंदीतून एमबीबीएसचं शिक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. येत्या 16 ऑक्टोबर रोजी अमित शहा (Amit Shah) यांच्या हस्ते भोपाळमध्ये हिंदीतून वैद्यकीय शिक्षण देण्याच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. मध्यप्रदेशातील एका ज्येष्ठ मंत्र्यानेच याबाबतची माहिती दिली आहे.
मध्यप्रदेशातील आरोग्य शिक्षण मंत्री विश्वास सारंग यांनी याबाबतची माहिती दिली. गृहमंत्री अमित शहा मोतीलाल नेहरू स्टेडियममध्ये होणाऱ्या कार्यक्रमात वैद्यकीय शिक्षण हिंदीतून देण्याच्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकाचे प्रकाशन करणार आहेत.
मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी येत्या 16 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. आपल्या मातृभाषेचा गौरव स्थापित करण्याचा हा कार्यक्रम आहे. लोकांची मानसिकता बदलण्यासाठीची ही ऐतिहासिक घटना आहे. विशेष विषय केवळ इंग्रजीतच नव्हे तर हिंदीतही शिकवले जाऊ शकतात हे सिद्ध करण्यासाठीचं हे महत्त्वाचं उदाहरण असेल, असं शिवराजसिंह चौहान म्हणाले.
येणाऱ्या काळात राज्यात वैद्यकीय शिक्षणाबरोबरच अभियांत्रिकी, नर्सिंग, पॅरामेडिकल कोर्सेस आदी कोर्सेसही हिंदीत शिकवले जातील. या कार्यक्रमाला अधिकाधिक लोक यावेत आणि हिंदी भाषेच्या तज्ज्ञ तसेच जाणकारांनीही भाग घ्यावा याबाबतच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. लोकांची मानसिकता बदलण्यासाठी हा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
फिजिओलॉजी, बायोकेमिस्ट्री आणि एनाटॉमी सारख्या विषयांच्या पुस्तकांचं पहिलं सेक्शन तयार आहे. एमबीबीएसच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ही पुस्तके दिली जाणार आहेत. तीन विषयांची पुस्तके एक्सपर्ट टीमने तयार केली आहेत. तसेच या पुस्तकांचे दुसरे सेक्शन तयार केले जात आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
या अभ्यासक्रमाच्या पुस्तकात रक्तदाब, कणा, हृदय, किडनी, यकृत आदी शरीरासंबंधीचे शब्द हिंदीत देण्यात आले आहेत. हिंदीतून एमबीबीएस पूर्ण केल्यानंतर कोणताही विद्यार्थी मागे राहू नये या हिशोबानेच पुस्तक तयार करण्यात आलं आहे.
त्यांना इंग्रजीच्या बरोबर हिंदीतूनही टेक्निकल आणि वैद्यकीय शब्द माहीत पडावेत अशा पद्धतीने या पुस्तकांची रुपरेखा तयार करण्यात आल्याचं या पुस्तकासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणारे सारंग यांनी सांगितलं.