मुंबई: पालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवणारी पालिका आता सामाजिक कार्यातही विद्यार्थ्यांना कोविड काळातील दोन वर्षांच्या ‘लर्निंग लॉस’ साठी अभ्यासक्रम सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न करीत आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना वाहतुकीचे धडे, आर्थिक व्यवहाराचे धडे, संगीताचे धडेही देण्यात येत आहे. यामध्ये मुंबईला ‘स्वच्छ-सुंदर’ बनवण्याच्या उपक्रमातही विद्यार्थ्यांचा समावेश करण्यासाठी कोर्स तयार करण्यात येणार आहे. शिक्षण, (Education) कला-क्रीडा (Arts-Sports) क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर पालिकेचे नाव उंचावणारे पालिका शाळांतील विद्यार्थी आता मुंबईकरांसाठी स्वच्छता दूत बनणार आहेत. यासाठी पालिकेचा शिक्षण विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि स्वच्छतेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून एक विशेष अभ्यासक्रम (Syllabus) तयार करण्यात येत आहे. हा कोर्स शिकलेले विद्यार्थी आपण राहत असलेल्या सोसायट्या, झोपडपट्ट्या आणि वस्तींच्या ठिकाणी रहिवाशांना, आपल्या कुटुंबाला कचरा व्यवस्थापनाचे धडे देणार असल्याचे शिक्षण सहआयुक्त अजित कुंभार यांनी सांगितले.
दरम्यान, पालिकेने 2 ऑक्टोबर 2017 पासून सोसायट्यांना कचऱ्याचे व्यवस्थापन करणे बंधनकारक केले आहे. यामध्ये २० हजार चौरस मीटरपेक्षा मोठ्या गृहनिर्माण सोसायट्या आणि 100 किलोंपेक्षा जास्त कचरा निर्माण होणाऱ्या इमारती- आस्थापनांना ओल्या कचऱ्याच्या विल्हेवाटीचे व्यवस्थापन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
पालिकेचा शिक्षण विभाग, घनकचरा व्यवस्थापन आणि सामाजिक संस्थेच्या माध्यमातून एक वर्षाच्या कोर्सचे सध्या डिझाईन बनवणे सुरू आहे. यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबाबत सामाजिक जागरूकता निर्माण करण्यासह कचरा व्यवस्थापन, कंपोस्टिंग व्हिडीओ, कार्टून्स, लिखित माहिती, प्रॅक्टिकल्सच्या माध्यमातून शिकवले जाईल.
मुंबईत मार्च 2020 मध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर आतापर्यंत तीन लाटा येऊन गेल्या. यातील सुरुवातीच्या दोन लाटा भयंकर होत्या. त्या ‘लॉकडाऊन’ काळात शिक्षणही ऑनलाइन सुरू होते, मात्र या ऑनलाइन शिक्षणात विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. याची माहिती मिळवण्यासाठी एक अभ्यासक्रम विकसित करण्यात येत आहे. यामध्ये इंग्रजी, गणित, विज्ञान यासह महत्त्वाच्या विषयांवर या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची चाचणी होईल. दोन वर्षांच्या अभ्यासक्रमाचे महत्त्वाचे विषय छोट्या स्वरूपात शिकवण्यात येतील. यानुसार त्या त्या विषयाच्या तज्ज्ञांच्या मदतीने प्रश्नसंच तयार करून विद्यार्थ्यांना ‘काय येते’, ‘काय येत नाही’, प्रत्यक्ष शाळेत येत नसल्याने काय नुकसान झाले याचा अंदाज घेतला जाईल. यानुसार शिक्षकांना ट्रेनिंग देऊन विद्यार्थ्यांना त्या त्या विषयात पारंगत करण्यासाठी मदत केली जाईल.