मुंबई: आता विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपलीये. उद्यापासून पालिका विद्यार्थ्यांना शालेय वस्तू मिळणार आहेत. मुंबई महानगरपालिका शाळांसाठी (BMC Schools) कायम वेगवेगळे उपक्रम राबवत असते. उत्तम शिक्षण, शिक्षणाचा दर्जा आणि विद्यार्थ्यांचा महानगरपालिकेच्या शाळांसाठी कल वाढावा यासाठीचे हे प्रयत्न असतात. यावर्षी विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी पालिकेने ‘एकच लक्ष्य- एक लक्ष’ हे ‘मिशन ॲडमिशन’ (BMC Mission Admission) राबवलं होतं. पालिकेत आठ प्रकारच्या माध्यमांच्या शाळा आहेत. विशेष म्हणजे या आठही प्रकारच्या माध्यमांत विद्यार्थ्यांची संख्या वाढलीये. त्यामुळे पालिकेच्या मिशनला चांगलंच यश मिळालं आहे. आता पालिकेच्या विद्यार्थ्यांची संख्या चार लाखांच्या घरात गेली आहे. या नव्या विद्यार्थ्यांनाही पालिकेच्या 27 मोफत वस्तूंसह (Free School Items) सर्व सुविधा मिळणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलंय.
कोरोना आटोक्यात आल्यानंतर मुंबईसह राज्यभरात दोन वर्षांनंतर 13 जूनपासून सर्व शाळा नियमित वेळेत आणि पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या आहेत. मात्र पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना अद्याप शालेय वस्तूंचे वाटप झालेले नव्हते. त्यामुळे पालिकेच्या विद्यार्थ्यांना मोफत मिळणाऱ्या 27 शालेय वस्तू कधी मिळणार असा सवाल उपस्थित केला जात होता. पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना उद्यापासून, सोमवारपासून वह्या, रेनकोट आणि स्टेशनरी यासारख्या शालेय वस्तूंचे वाटप सुरू होणार आहे. यामध्ये आठवी ते दहावीपर्यंतच्या 90 हजार विद्यार्थ्यांना छत्रीसाठी प्रत्येकी 270 रुपये देण्यात येत आहेत. शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी ही माहिती दिली.
2017 च्या निवडणुकीत पालिकेत निवडून आलेल्या नगरसेवकांची मुदत 7 मार्च 2022 रोजी संपल्यानंतर प्रशासकाचा कारभार सुरू झाला, मात्र या प्रक्रियेत पालिकेचे अनेक प्रस्ताव, वस्तूंच्या खरेदीचे प्रस्तावही रखडले होते, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. सुमारे 4 लाख झाल्यामुळे सर्व वस्तू देण्यास सुरुवात होणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, या वर्षीच्या नव्या स्वरूपातील गणवेशाचे वाटपही पालिकेच्या विद्यार्थ्यांना लवकरच करण्यात येईल, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.