11th admission process 2024: राज्यात दहावीचा निकाल लागल्यानंतर अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली. राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महापालिका या भागासाठी केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया होणार आहे. त्यासाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना आता ५ जूनपासून रविवारी १६ जूनपर्यंत महाविद्यालयाचा पसंती क्रमांक भरता येणार आहे. २६ जून रोजी सकाळी दहा वाजता अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. त्यानंतर २६ ते २९ जून दरम्यान महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. सध्या पहिल्याच प्रवेशफेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
२०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी मुंबई महानगरक्षेत्रातील १ लाख ३३ हजार २९२ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्जाचा पहिला भाग भरला आहे. त्यातीतल ७९ हजार ४८१ विद्यार्थ्यांचे अर्ज लॉक केले आहेत. पुणे, पिंपरी चिंचवडासाठी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहे.
विद्यार्थ्यांना https://11thadmission.org.in या संकेतस्थळावरून ऑनलाइन नोंदणी भरता येणार आहे. त्यासाठी आपले शहर निवडावे लागणार आहे. या संकेतस्थळावर नोंदणी केल्यानंतर लॉग इन आयडी व पासवर्ड मिळणार आहे. त्यानंतर वैयक्तिक माहिती असणारा अर्जाचा भाग १ भरावा. त्यानंतर माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयाकडून अर्ज प्रमाणित करून घ्यावा लागणार आहे. महाविद्यालय पसंतीक्रम असणारा अर्जाचा दुसरा भाग ५ जूनपासून सुरु होत आहे. अर्जाचा भाग २ भरून किमान १ व कमाल १० महाविद्यालये ऑनलाइन पद्धतीने निवडावी लागणार आहे.