नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (National Testing Agency) कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्टचा (CUET-UG) निकाल 7 सप्टेंबरच्या आसपास जाहीर करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. एनटीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. एकदा का निकाल जाहीर झाला की, उमेदवार cuet.samarth.ac.in अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन आपला निकाल तपासू शकतात. सीयूईटी-यूजी परीक्षेचा सहावा आणि अंतिम टप्पा 30 ऑगस्ट रोजी होणार आहे. यंदा देशातील केंद्रीय विद्यापीठांसह अनेक विद्यापीठांचे (Universities) प्रवेश ‘सीयुईटी’च्या स्कोअरच्या माध्यमातून होणार आहेत. एनटीएच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “सीयूईटी-यूजीसाठी विषयाच्या पेपरची संख्या खूप जास्त आहे. मूल्यमापन पूर्ण करून 7 सप्टेंबरपर्यंत निकाल जाहीर करण्याचा प्रयत्न करू. म्हणजेच सीयूईटीचा निकाल 7 सप्टेंबरपर्यंत जाहीर होऊ शकतो, तर जास्तीत जास्त 10 सप्टेंबरपर्यंत निकाल जाहीर केला जाऊ शकतो. सुरुवातीला सीयूईटी परीक्षा दोन टप्प्यांत होणार होती.
परीक्षेच्या दुसऱ्या टप्प्यात अनेक वेळा तांत्रिक त्रुटी दिसून आल्या. यामुळे परीक्षा पुढे ढकलावी लागली आणि अनेक ठिकाणी पेपर रद्द झाले. दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा 4 ते 6 ऑगस्ट दरम्यान घेण्यात आली. आता सीयूईटी परीक्षा सहा टप्प्यांत होत असून ती ३० ऑगस्टला संपणार आहे, तर पहिली परीक्षा २० ऑगस्टला संपणार होती. 4 ऑगस्ट रोजी सीयूईटी परीक्षेची दुसरी शिफ्ट पूर्णपणे रद्द करण्यात आली होती. एनटीएला प्रश्नपत्रिका वेळेवर अपलोड करण्यात अपयश आले होते. यामुळे ५० हजार विद्यार्थ्यांना केंद्रांवरून परीक्षा न देताच घरी परतावे लागले. त्याचबरोबर 5 ऑगस्ट आणि 6 ऑगस्ट रोजी तांत्रिक अडचणीही समोर आल्या होत्या.
तर, परीक्षेच्या दुसऱ्या टप्प्यात (४, ५ आणि ६ ऑगस्ट रोजी झालेल्या) तांत्रिक अडचणींमुळे ज्यांना परीक्षा देता आली नाही, त्यांना सहाव्या टप्प्यात (२४ ते ३० ऑगस्टदरम्यान) परीक्षा देता येणार आहे. या उमेदवारांना शनिवारी त्यांच्या शहरांबद्दल आणि नवीन परीक्षेची तारीख याबद्दल माहिती देण्यात आली आणि त्यांचे प्रवेशपत्र २० ऑगस्ट रोजी जाहीर केले जाईल. सीयूईटी परीक्षेच्या निर्णयाचा थेट अर्थ असा आहे की सर्व केंद्रीय विद्यापीठांमध्ये प्रवेशाची तारीख वाढविली जाणार आहे.