Degrees dont matter: देशात कधी काळी अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षणाला प्रचंड महत्व होते. माझा मुलगा इंजिनिअर होणार? असे पालक अभिमानाने सांगत होते. त्यानंतर इंजिनिअर झालेल्या अनेकांना नोकरी मिळत नसल्याचे समोर येऊ लागले. आता नुसती पदवी उपयोगाची राहिली नाही. पदव्यांचे महत्व कमी झाले आहे. एका अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. 83% इंजिनियरिंग पदवीधर आणि 46% टक्के व्यवस्थापन शास्त्राच्या पदवीधारकांना नोकरीसाठी इंटर्नशिपची ऑफर मिळत नाही. कंपन्या आता विद्यापीठ, महाविद्यालयाच्या पदवीपेक्षा स्किल्सला जास्त महत्व देत असल्याचे समोर आले आहे.
अहवालानुसार, 73% रिक्रूटर्स आता पदवीऐवजी उमेदवारांच्या कौशल्यांवर लक्ष केंद्रित करत आहेत. यामुळे ज्यांनी नवीन कौशल्ये शिकण्यात रस घेतला, त्या तरुणांना फायदा होत आहे. GenZ व्यावसायिकांमध्ये फ्रीलान्सिंग आणि साइड हस्टल्सची क्रेझ झपाट्याने वाढत आहे. अहवालात असे म्हटले आहे की 51% GenZ तरुण अतिरिक्त उत्पन्नासाठी फ्रीलांसिंग करतात. बिझनेस स्कूलच्या विद्यार्थ्यांमध्ये हा आकडा 59 % वर पोहोचला आहे.
काही क्षेत्रांमध्ये वेतन समानता दिसली असली तरीही, कला आणि विज्ञान पदवीधरांसाठी लैंगिक वेतन अंतर अजूनही अस्तित्वात आहे. महिला व्यावसायिकांला 6 लाखांपेक्षा कमी पॅकेज मिळत आहे, तर त्यांचे पुरुष सहकारी अधिक कमावतात. तथापि, बी-स्कूल आणि ई-स्कूलमध्ये पगारात मोठा फरक दिसला नाही. GenZ आणि रिक्रूटर्समधील फरक देखील कार्यस्थळाच्या संस्कृतीत दिसून आला. 77% तरुण व्यावसायिकांना त्यांचे परफॉर्मेंस रिव्यू मासिक किंवा प्रकल्प आधारित असावेत, असे वाटते. परंतु 71% कंपन्या अजूनही वार्षिक किंवा द्वि-वार्षिक परफॉर्मेंस रिव्यू प्राधान्य देतात.
नोकरीसाठी टेक कंपन्या आजही तरुणांची पहिली पसंती आहेत. अभियांत्रिकी पदवीधरांसाठी गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि अमेझॉन हे चांगले पर्याय आहेत. तसेच झोमॅटो आणि मिशो यासारख्या नवीन कंपन्याही तरुणांना आकर्षित करत आहेत. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचाही आता एचआर सारख्या क्षेत्रांमध्ये रस वाढत आहे. कंपन्या कौशल्यावर आधारित नोकरीला अधिक महत्त्व देत आहेत. यामुळे तरुणांनी आपले कौशल्य अपडेट करत राहावे आणि उद्योगाच्या गरजेनुसार स्वत:ला तयार करावे, असे अहवालात म्हटले आहे.