मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि सर्व शिक्षक, पदवीधर आमदार यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत शिक्षणमंत्री यांनी वाढीव पदाबाबत सविस्तर प्रस्ताव तयार करून मंत्रिमंडळासमोर सादर करण्याची सकारात्मक भूमिका जाहीर केली. तसेच शिक्षक, कर्मचारी यांचे विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची बैठक होती. यामुळे शिक्षक, कर्मचारी यांना मोठा दिलासा मिळेल. विशेष म्हणजे या बैठकीनंतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत प्रस्ताव तयार करण्याचा आदेश शिक्षणमंत्र्यांनी शिक्षण आयुक्त यांना दिला आहे.
या बैठकीत आमदार कपिल पाटील यांनी प्रत्येक विषयाला शिक्षक मिळाला पाहिजे, शाळा तिथे मुख्याध्यापक पाहिजे आणि कला – क्रीडा शिक्षकांना संचमान्यतेत स्थान मिळाले पाहिजे असे मुद्दे मांडले. शिक्षणमंत्र्यांनी आमदार कपिल पाटील यांचे मुद्दे मान्य करत तातडीने यासंदर्भात नवीन संचमान्यता लागू करण्याचे आश्वासन दिले.
तसेच 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त सर्व अनुदानित, विनाअनुदानित, अंशतः अनुदानित, वाढीव तुकड्यांवर कार्यरत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लावण्याबाबत प्रस्ताव तयार करण्याचा आदेश शिक्षणमंत्र्यांनी शिक्षण आयुक्त यांना दिले. हा प्रस्ताव मंत्रिमंडळाने मान्य केल्यास राज्यातील 35 हजार शिक्षक, कर्मचारी यांना जुनी पेन्शन मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकेल, असा विश्वास आमदार कपिल पाटील यांनी व्यक्त केला.
डिजिटल युगामध्ये संगणक शिक्षण अतिशय महत्त्वाचे ठरत आहे. कोरोनाकाळात ऑनलाईन शिक्षणाचा प्रयत्न केला गेला. या सर्व पार्श्वभूमीवर शाळा तिथे पूर्णवेळ संगणक शिक्षक मिळाला पाहिजे, तसेच यापूर्वी कार्यरत शिक्षकांना मान्यता देऊन त्यांच्याही सेवा पूर्वरत करण्याची मागणी आमदार कपिल पाटील यांनी यावेळी केली. शिक्षण, विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्यादृष्टीने सकारात्मक बदल घडवणारी ही बैठक 17 नोव्हेंबर रोजी पार पडली.
इतर बातम्या :