मातृभाषेत इंजिनिअरिंगचे शिक्षण द्यावे, असे निर्देश अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदने (AICTE) दिले आणि त्यानुसार सगळी तयारी दर्शविण्यात आली. हा इंजिनिअरिंग क्षेत्रातला (Engineering) ऐतिहासीक निर्णय म्हटला जातो. यानंतर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले जसे की तांत्रिक अभ्यासक्रमाचे भाषांतर मराठीत करून किंवा इतर कुठल्याही भाषेत करून ती व्यवहारात कशा पद्धतीने आणली जाणार? नोकरी मिळणं अधिक कठीण होणार का? पण या ऐतिहासिक निर्णयाचं (Historical Decision) कौतुक आणि स्वागत जास्त केलं गेलं. त्यानंतर त्या दिशेनं पहिलं पाऊल टाकत इंजिनीअरिंगच्या प्रथम वर्षाचा अभ्यासक्रम इंग्रजी भाषेतून प्रादेशिक भाषांमध्ये अनुवादित केला गेला. आता द्वितीय वर्षाचा अभ्यासक्रमही 12 प्रादेशिक भाषांमध्ये अनुवादित करण्याचे काम अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) सुरू केले आहे. त्यासाठी 18.6 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
देशातील विद्यार्थ्यांना इंग्रजीव्यतिरिक्त प्रादेशिक भाषेमध्येही इंजिनीअरिंगचे शिक्षण घेता यावे यासाठी एआयसीटीईने पुढाकार घेतला आहे, 18.6 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. इंजिनीअरिंगचे शिक्षण स्वदेशी भाषांमध्ये देण्याची तरतूद नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात करण्यात आली आहे. शिक्षण घेण्यासाठी भाषेचा अडथळा येऊ नये हा त्यामागचा हेतू आहे. प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमानंतर अन्य वर्षांचे अभ्यासक्रमही टप्प्याटप्प्याने प्रादेशिक भाषेत अनुवादित केले जात आहेत, असे एआयसीटीईचे अध्यक्ष अनिल सहस्रबुद्धे यांनी सांगितले. हिंदी, मराठी, बंगाली, तामीळ, तेलुगू, गुजराथी, कन्नड, पंजाबी, ओडिया, आसामी, उर्दू आणि मल्याळम या भाषांमध्ये इंजिनीअरिंगचा अभ्यासक्रम अनुवादित केला जात आहे.
महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, हरयाणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, तामीळनाडू, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये 40 शैक्षणिक संस्थांमध्ये इंजिनीअरिंगचे शिक्षण सहा प्रादेशिक भाषांमधूनही देण्यास सुरुवात झाली आहे. त्यात मराठी, हिंदी, बंगाली, कन्नड, तामीळ आणि तेलुगू या भाषांचा समावेश आहे. 2022-23 या शैक्षणिक वर्षात 2070 विद्यार्थी प्रादेशिक भाषांमधून इंजिनीअरिंग करत आहेत.