मुंबई : मुंबई विद्यापीठात (Mumbai University) मागील काही वर्षापासून अध्ययनासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. परदेशी विद्यार्थ्यांचा मुंबई विद्यापीठाकडे असणारा हा ओढा लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय दर्जाचे विद्यार्थी वसतिगृह बांधण्यात आले असून त्याचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते शनिवारी झाले. सध्या या वसतिगृहाच्या नामांतराचा वाद सुरू झाला आहे. या वसतिगृहाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव दिले जावे, असा प्रस्ताव राज्यपालांनी (Governor) विद्यापीठ प्रशासनासमोर मांडला असतानाच छात्रभारती (Chatrabharati) विद्यार्थी संघटनेने मात्र छत्रपती शाहू महाराजांचे नाव देण्यात यावे अशी मागणी केलीये. हे वसतिगृह अधिकृतरीत्या सुरुही झाले नाही तोच त्याच्या नामांतराचा वाद समोर आल्याने विद्यापीठ प्रशासनासमोर मोठा पेच निमार्ण झाला आहे.
आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहाला छत्रपती राजश्री शाहू महाराज यांचे नाव देण्याची विद्यार्थ्यांची मागणी रास्त आहे व ती मुंबई विद्यापीठाने मान्य केलीच पाहिजे. शाहू महाराजांनी समानतेवर आधारित पुरोगामी विचारसरणीचा पाया रचला. सर्व जाती पंथांच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी झटले. pic.twitter.com/65m7lG7HH4
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) July 13, 2022
राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यार्थी वसतिगृहाच्या नामांतराचा वाद आता सुरू झाला आहे. कलिना संकुलातील विद्यापीठाच्या 4 शैक्षणिक इमारतींचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वसतिगृहाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव दिले जावे, असा प्रस्ताव राज्यपालांनी विद्यापीठ प्रशासनासमोर मांडला. पण दुसरीकडे छत्रपती शाह महाराजांचे शैक्षणिक कार्य हे समस्त विद्यार्थी वर्गास प्रेरणादायी असल्याने वसतिगृहाला छत्रपती शाहू महाराजांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी छात्रभारती विद्यार्थी संघटनेने कुलगुरुंना पत्राद्वारे केली आहे.
सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांसाठी शाहू महाराजांनी विविध वसतिगृह सुरु केले. परदेशी शिक्षण घेता यावे यासाठी शिष्यवृत्ती दिली. हे वर्ष छत्रपती शाहू महाराजांचे स्मृती शताब्दी वर्ष आहे. शाहू महाराजांचे निधन हे मुंबईत झाले म्हणून मुंबई विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहाला छत्रपती शाहू महाराजांचे नाव देण्यात यावे अशी मागणी छात्रभारतीचे कार्याध्यक्ष रोहित ढाले यांनी केलीये. शाहू महाराजांचे विचार, त्यांचे कार्य, त्यांची समतेची शिकवण विचारात घेता कुणा अन्य व्यक्तीचे नाव या वसतिगृहाला दिले जाऊ नये, अशी मागणी छात्रभारतीचे कार्याध्यक्ष रोहित ढाले यांनी केली आहे. त्यामुळे हा वाद येत्या काळात तापण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान, काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनीही ट्विट करून वसतिगृहाला शाहू महाराजांचे नाव देण्याची मागणी केली आहे. आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहाला छत्रपती राजश्री शाहू महाराज यांचे नाव देण्याची विद्यार्थ्यांची मागणी रास्त आहे. ती मुंबई विद्यापीठाने मान्य केलीच पाहिजे. शाहू महाराजांनी समानतेवर आधारित पुरोगामी विचारसरणीचा पाया रचला. सर्व जाती पंथांच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी झटले, असं सावंत यांनी म्हटलं आहे.