देशभरातील कॉलेजांमध्ये लवकरच नवे शैक्षणिक सत्र सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत रॅगिंगसारख्या गंभीर गुन्ह्यांना दोन हात करण्याची तयारी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) यापूर्वीच केलीये. यूजीसीने सर्व महाविद्यालये आणि विद्यापीठांना आपापल्या राज्यात रॅगिंगविरोधी नियम कडक करण्यास सांगितले आहे. आयोगाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, यूजीसीने कॉलेज कॅम्पसमध्ये अँटी रॅगिंग सेल तयार करण्यापासून ते सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यापर्यंत अनेक खबरदारीच्या उपाययोजना करण्यास सांगितले आहे. प्रवेशानंतर रॅगिंगचे प्रकार सर्रासपणे अनेक कॉलेजांमध्ये पाहायला मिळतात.
रॅगिंगविरोधी समित्या, रॅगिंगविरोधी पथक, रॅगिंगविरोधी कक्ष आणि कॉलेजमधील प्रमुख ठिकाणी कॅमेरे बसविण्यास यूजीसीने कॉलेजांना सांगितले आहे.
याशिवाय यूजीसीने कॉलेजांना आपापल्या ठिकाणी अँटी रॅगिंग वर्कशॉप आयोजित करण्यास सांगितले. यूजीसीने आपल्या ताज्या अधिसूचनेत सर्व महाविद्यालयांना “विद्यार्थ्यांशी सतत संवाद साधण्यास आणि त्यांच्यासाठी समुपदेशन सत्रे आयोजित करण्यास” सांगितलेत.
या अधिसूचनेत यूजीसीने म्हटले आहे की, वसतिगृहे, विद्यार्थी, निवास व्यवस्था, कँटीन, मनोरंजन कक्ष, शौचालये, बसस्थानके अशा ठिकाणी अचानक तपासणी करावी.
प्रवेश केंद्र, विभाग, ग्रंथालये, कँटीन, वसतिगृहे, सामाईक सुविधा अशा ठिकाणी रॅगिंगविरोधी फलक लावावेत. रॅगिंगसारख्या समस्यांनी ग्रस्त विद्यार्थी नॅशनल अँटी-रॅगिंग हेल्पलाईन नंबरवर कॉल करू शकतो.
हेल्पलाईन नंबर- 1800-180-5522 {24×7 टोल फ्री) वर कॉल करू शकतात.
तसेच विद्यार्थी रॅगिंगविरोधी हेल्पलाइन ईमेल helplin@antiragqins.in मेल करू शकतो.
त्याचबरोबर इतर कोणत्याही प्रकारच्या माहितीसाठी तुम्ही antiragging.in जाऊ शकता. याशिवाय विद्यार्थी सेंटर फॉर यूथच्या (C4Y) मोबाइल क्रमांकावर 9818044577 कॉल करू शकतात.