आता पदवी, पदविकेसाठी ‘कालमर्यादा’ नाही; पुढील वर्षापासून ‘श्रेयांक बँक’ लागू होणार

| Updated on: Jan 28, 2021 | 4:31 PM

भारतीय शिक्षण व्यवस्थेत आता अमुलाग्र बदल होणार आहेत. आता पदवीसाठी तीन वर्षे, पदव्युत्तर शिक्षणासाठी दोन वर्षे थांबण्याची गरज नाही. (higher education framework will change from next year)

आता पदवी, पदविकेसाठी कालमर्यादा नाही; पुढील वर्षापासून ‘श्रेयांक बँक’ लागू होणार
सांकेतिक फोटो
Follow us on

नवी दिल्ली: भारतीय शिक्षण व्यवस्थेत आता अमुलाग्र बदल होणार आहेत. आता पदवीसाठी तीन वर्षे, पदव्युत्तर शिक्षणासाठी दोन वर्षे थांबण्याची गरज नाही. आता विविध विषयांचे श्रेयांक साठवून त्यानुसार तुम्ही प्रणाणपत्र, पदविका, पदवी घेऊ शकता. पुढील वर्षापासून देशात श्रेयांक बँकेची संकल्पना राबवण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कमी वेळात शैक्षणिक वर्ष पूर्ण करता येणार असून त्यांच्या प्रतिभेलाही वाव मिळणार आहे. (higher education framework will change from next year)

विद्यापीठ अनुदान आयोगाने या नव्या शिक्षण पद्धतीच्या श्रेयांक बँक संकल्पनेचा मसुदा तयार केला आहे. पुढील वर्षापासून ही संकल्पना राबविण्यासाठी युजीसीने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केला आहे. एखादी पदवी घेण्यासाठी आता विद्यार्थ्यांना दोन-दोन, तीन-तीन वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याची गरज राहणार नाही. ठराविक कालमर्यादेचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याची चौकट आता विद्यार्थ्यांना पाळण्याची गरज नाही. श्रेयांक पद्धतीनुसार विद्यार्थ्यांना आता वेगवेगळ्या टप्प्यातील शैक्षणिक मान्यता मिळवण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे.

नव्या शैक्षणिक धोरणाचा परिणाम

केंद्र सरकारने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणलं आहे. या धोरणानुसार शैक्षणिक पद्धतीचा सर्वांगीण विचार करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना पदवीच्या कालमर्यादेच्या चौकटीतून बाहेर काढण्यासाठी शैक्षणिक श्रेयांक बँकेची स्थापना करण्यासाठी आयोगाने मसुदा तयार केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना विषय आणि कालमर्यादा निवडीचे स्वातंत्र्य मिळणार आहे.

अशी असेल श्रेयांक बँक

साधारणपणे पदवी घेण्यासाठी तीन वर्षे तर पदव्युत्तर पदवी घेण्यासाठी दोन वर्षे जातात. तसेच ही पदवी घेताना विद्यार्थ्यांना ठरावीक वर्षात ठरावीक विषयच शिकण्याचे बंधन आहे. श्रेयांक बँकेने ही चौकट मोडली आहे. या नव्या पद्धतीनुसार विद्यार्थ्यी हवे ते विषय मिळवून त्याचे श्रेयांक मिळवू शकतील. प्रत्येक विषयाचे श्रेयांक मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना ठरावीक तास शिक्षण पूर्ण करणे, प्रकल्प पूर्ण करणे बंधनकारक आहे. प्रमाणपत्र, पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी अशा प्रत्येक टप्प्यासाठी निश्चित करण्यात आलेले श्रेयांक खात्यात साठल्यावर विद्यार्थी त्यांच्या गरजेनुसार त्यांचा वापर करू शकतील. एका विषयाचे श्रेयांक सात वर्षांपर्यंत विद्यार्थ्यांना वापरता येऊ शकतील. त्याचप्रमाणे एका विषयाचे श्रेयांक एका टप्प्यासाठी वापरल्यास ते दुसऱ्या टप्प्यासाठी वापरता येणार नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ तर वाचणार आहेच शिवाय त्यांना त्यांच्या आवडीच्या विषयात करिअर करण्याची संधीही मिळणार आहे. पर्यायाने विद्यार्थ्यांना त्यांची प्रतिभा दाखवता येणार आहे. (higher education framework will change from next year)

 

संबंधित बातम्या:

CBSE board exam 2021 schedule : 10 वी आणि 12 वीच्या वेळापत्रकाची घोषणा 2 फेब्रुवारीला : रमेश पोखरियाल निशंक

पुण्याच्या जुई केसकरचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, पार्किन्सनवरील उपकरणासाठी गौरव

श्रीकांत दातार यांना ‘पद्मश्री’, हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या मराठमोळ्या डीनचा भारावणारा प्रवास

(higher education framework will change from next year)