नाशिक : मुंबईत (Mumbai) वांद्रामधील उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या तीन एकर जागेत सर्व समुदायांसाठी राज्यातील सर्वात मोठं वसतिगृह (Hostel) उभारणार असून, या वसतिगृहात सारथी, महाज्योती व आर्थिक दुर्बल घटक व सर्व जाती, धर्माच्या समुदायातील मुला-मुलींना प्रवेश दिला जाईल अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांनी केलीये. आज उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत स्व. यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्ष योजनेतंर्गत निर्माण करण्यात आलेल्या मातोश्री मुलींचे वसतिगृहाच्या लोकार्पण सोहळाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण मंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत अन्य मान्यवरांसह उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, आज मातोश्री मुलीच्या वसतिगृहाचे लोकार्पण झाले असून, या वसतिगृहात महाज्योती, सारथी व आर्थिक दुर्बल घटकातील सर्वच विद्यार्थींनींना एकत्र राहून शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. व एकत्रित शिक्षणाने सर्वांमध्ये एकोप्याची भावना दृढ होणार आहे.
लहानपणासूनच शिक्षणासाठी सर्वांना एकत्र येण्याची संधी मिळाल्यास शिक्षणासोबतच प्रत्येकाचा सर्वांगीण विकास घडणार आहे. सर्व मुला-मुलींनी उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील राहून, डॉक्टर, इंजिनियर्स, आय. टी. क्षेत्रात प्राविण्य मिळविले पाहिजे.शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. शिकून देशाचे नाव उज्वल करा असा संदेश यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यावेळी बोलताना म्हणाले की, आज मातोश्री मुलींच्या वसतिगृहाच्या धर्तीवरच रत्नागिरी, औरंगाबाद व नागपूर या ठिकाणी 2 वसतिगृहे सुरू करणार आहेत. भविष्यातही वसतिगृहांची निर्मिती चळवळ महाराष्ट्रभर राबविणार आहोत. मातोश्री मुलींच्या वसतिगृहात 200 विद्यार्थी क्षमता असून यात 75 विद्यार्थी सारथी संस्थेकडून, 75 विद्यार्थी महाज्योती संस्थेकडून, 50 विद्यार्थी आर्थिक व दुर्बल घटकातून उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून प्रवेशित केले जाणार आहेत.
या कार्यक्रमाला शहरातील पॉलिटेक्निकल कॉलेज, एच पी टी कॉलेज,के.टी.एच. कॉलेज, स्कॉऊट, एन.सी.सी चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पुजन करून दिप प्रज्वलन करण्यात आले.
इतर बातम्या :