बारावीचा निकाल (12th Results) लागून एक महिना झालाय. जेव्हा निकाल लागला त्याच दिवशी पुरवणी परीक्षेची माहिती देण्यात आली होती. आता याचसंदर्भात मोठी बातमी आहे. बारावीच्या पुरवणी परीक्षेत थोडे बदल करण्यात आलेले आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत जुलै- ऑगस्ट 2022 मध्ये होत असलेल्या बारावीच्या पुरवणी (12th Supplementary Exam) परीक्षेत अंशतः बदल करण्यात आला आहे. या परीक्षेचं सुधारित वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आलेलं आहे. बारावीच्या व्यावसायिक द्विलक्ष्यी अभ्यासक्रम पेपर एक आणि दोन विषयांच्या 6,10 आणि 12 ऑगस्ट रोजी होणाऱ्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून, सुधारित वेळापत्रक (New Timetable) मंडळाच्या संकेतस्थळावर देण्यात आले.
या वेळापत्रकातील अंशतः बदलाची सर्व संबंधित उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक / प्राचार्य, विद्यार्थी, पालक आणि अन्य घटकांनी नोंद घ्यावी. परीक्षेच्या तारखांबाबतचे सुधारित वेळापत्रक मंडळाच्या ‘www. mahahsscboard.in‘ या अधिकृत संकेतस्थळावर 1 ऑगस्ट, उद्यापासून उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
राज्य मंडळामार्फत 21 जुलै ते 12ऑगस्टदरम्यान बारावीची पुरवणी परीक्षा होत आहे. या परीक्षेला श्रेणी सुधार योजनेअंतर्गत प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थी राज्य सामाईक प्रवेशपरीक्षा कक्षामार्फत घेण्यात येणारी ‘एमएचटी सीईटी’ परीक्षाही देणार आहेत. त्यामुळे त्या कालावधीत होणाऱ्या बारावीच्या पुरवणी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.