कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (CISCE) बोर्डाच्या इयत्ता दहावी आणि बारावीचा निकाल आज जाहिर करण्यात आलाय. आयसीएसई बोर्डाच्या साईटवर जाऊन विद्यार्थी आपले निकाल पाहू शकतात. 6 मेला सकाळी 11 वाजता हा निकाल जाहिर करण्यात आलाय. results.cisce.org, cisce.org या साईटला जाऊन विद्यार्थी निकाल बघू शकतात. विशेष म्हणजे आयसीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल सर्वोत्कृष्ट आहे. दक्षिणेकडील प्रदेशात सर्वाधिक उत्तीर्णतेची टक्केवारी म्हणजे 99.53%, त्यानंतर पश्चिम क्षेत्राची 99.32% आहे.
आयसीएसई बोर्डाची इयत्ता 12वीची एकूण उत्तीर्ण टक्केवारी 98.19% आहे. यंदा या परीक्षेत तब्बल 98,088 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दुसरीकडे आयसीएसईच्या दहावी परीक्षेची उत्तीर्ण टक्केवारी 99.47% आहे. यंदा तब्बल 2,42,328 विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. बारावीच्या निकालात मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 98.92% आणि मुलांची टक्केवारी 97.53% आहे.
विशेष म्हणजे यंदाच्या दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारल्याचे बघायला मिळत आहे. दहावीमध्ये मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 99.65% आणि मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण 99.31% आहे. म्हणजे काय तर मुली मुलांपेक्षा अधिक वरचढ ढरल्या आहेत. विभागानुसार देखील टक्केवारी जाहीर करण्यात आलीये. दहावीमध्ये पश्चिम विभागाने बाजी मारलीये.
दहावीच्या निकालामध्ये पश्चिम विभागाची उत्तीर्णतेची टक्केवारी सर्वात जास्त चांगली आहे. पश्चिम विभागाची उत्तीर्णतेची टक्केवारी सर्वाधिक आहे, म्हणजेच 99.91% आणि त्यानंतर दक्षिण क्षेत्र 99.88% आहे. थोडक्यात काय तर यंदा देखील आयसीएसई बोर्डाचा निकाल धमाकेदार लागलाय. 1366 शाळांपैकी सुमारे 66.18% (904) शाळांची उत्तीर्णतेची टक्केवारी 100 हे विशेष आहे.
12वी परीक्षेसाठी 1285 परीक्षा केंद्रे आणि 887 मूल्यमापन केंद्रे होती. दहावी म्हणजेच आयसीएसई परीक्षेत 2695 शाळांनी भाग घेतला होता, ज्यामध्ये 82.48% (2223) शाळांनी 100% उत्तीर्ण होण्याची टक्केवारी मिळवली आहे. आयसीएसईनुसार या परीक्षेसाठी 2503 परीक्षा केंद्रे आणि 709 मूल्यमापन केंद्रे होती. गेल्या कित्येक दिवसांपासून विद्यार्थी हे या निकालाची वाट पाहत होते.