नवी दिल्ली: केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या (Union Ministry Of Education) उच्च शिक्षण संस्थांच्या (Higher Educational Institutions) भारत रँकिंग 2022 मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी-मद्रासने (IIT Madras) अव्वल स्थान पटकावले आहे, अशी माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेद्र प्रधान यांनी शुक्रवारी जाहीर केलेल्या यादीत दिली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स-बेंगळुरू आणि आयआयटी-बॉम्बे या संस्थांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला आहे. आयआयएससी बेंगळुरूला सर्वोत्कृष्ट विद्यापीठ, तर जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आणि दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया यांना अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळाला आहे.
आयआयटी मद्रास हे उत्तम इंजिनीअरिंग कॉलेज असून त्यानंतर आयआयटी दिल्ली आणि आयआयटी मुंबईचा क्रमांक लागतो. आयआयएम-अहमदाबाद ही भारतातील सर्वोत्तम बिझनेस स्कूल म्हणून ओळखली जाते, त्यानंतर आयआयएम-बंगळुरू आणि आयआयएम-कलकत्ता यांचा क्रमांक लागतो. फार्मसी संस्थांमध्ये जामिया हमदर्दने अव्वल क्रमांक पटकावला आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, हैदराबाद हे श्रेणीत दुसऱ्या क्रमांकावर आहे तर पंजाब युनिव्हर्सिटी, चंदीगड तिसऱ्या क्रमांकावर आहे.
Release of #IndiaRankings2022 for higher educational institutes. https://t.co/Nxz8JyFyDy
— Dharmendra Pradhan (@dpradhanbjp) July 15, 2022
मिरांडा हाऊस हे या क्रमवारीनुसार सर्वोत्तम महाविद्यालय आहे, तर हिंदू महाविद्यालय दुसऱ्या क्रमांकावर आहे, त्यानंतर प्रेसिडेन्सी महाविद्यालयाचा क्रमांक लागतो. एम्स, नवी दिल्ली, हे जाहीर केलेल्या यादीनुसार सर्वोत्तम वैद्यकीय महाविद्यालय आहे. चेन्नईतील सविठा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल अँड टेक्निकल सायन्सेस हे या यादीनुसार उत्तम दंत महाविद्यालय आहे. आयआयएम अहमदाबाद ही देशातील सर्वोत्तम व्यवस्थापन संस्था असून त्यानंतर आयआयएम बेंगळुरू आणि आयआयएम कलकत्ता यांचा क्रमांक लागतो.