मे महिना (May Month) सुरु झाल्याने देशातील अनेक राज्यांमध्ये यंदा प्रचंड उकाडा आणि उष्णतेची लाट (Heat Wave) पाहायला मिळतीये. इतक्या उकाड्यात सुद्धा अनेक राज्यांमध्ये बोर्डाच्या आणि शाळांच्या परीक्षा (School Exams) होत आहेत, तर काही राज्यांमध्ये नव्या सत्राला देखील सुरुवात झाली आहे. अशा परिस्थितीत केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने शाळांना उन्हाचा सामना करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये शाळा व्यवस्थापनाला त्यांच्या शाळांमधील गणवेशाचे नियम शिथिल करण्याचा प्रयत्न करण्यास सांगितलं आहे. अशा उकाड्यात शाळेचा गणवेश घालून यायला मुलांना अडचणी येतात. प्रचंड उष्णता लक्षात घेता, विद्यार्थ्यांना हलके आणि हवेशीर कपडे घालण्याची परवानगी देण्यात यावी किंवा त्या दृष्टीने प्रयत्न करावा अशी सूचना या मार्गदर्शक सूचनांमध्ये करण्यात आलेली आहे.
त्याचबरोबर केंद्रीय शिक्षण मंत्रालयानेही शाळांना वेळेमध्ये बदल करण्यास सांगितले आहे. अनेक राज्यांत शाळेची वेळ सकाळी १० ते दुपारी ४ अशी असते तर काही राज्यांत सकाळी ८ ते दुपारी २ अशी असते. दुपारी २ वाजता उकाडा शिगेला पोहचतो आणि उष्णतेची लाट अतिशय तीव्र असते. त्यामुळे केंद्रीय शिक्षण मंत्रालयानेही शाळांना वेळांमध्ये बदल करण्यास सांगितलं आहे.