ठाणे: शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर (Teachers) कर्मचाऱ्यांना आता दुय्यम सेवा पुस्तक व वेतन स्लिप देणे सक्तीचे केले असून भाजपा शिक्षक आघाडीच्या पाठपुराव्यामुळे आज मुंबईच्या शिक्षण उपसंचालकांनी आदेश काढले असल्याचे भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी सांगितले. अनेक शाळांमध्ये सर्विस बुकची (Service Book) दुय्यम प्रत व सॅलरी स्लिप देत नसल्याच्या तक्रारी येत होत्या या तक्रारींची दखल घेत भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी 14 जुलै 2022 रोजी शिक्षण उपसंचालकांची प्रत्यक्ष भेट घेऊन याबाबत तक्रार करून निवेदन दिले होते. या निवेदनाची तात्काळ दखल घेत मुंबई विभागाचे शिक्षण उपसंचालक यांनी आज 26 जुलै रोजी शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई उत्तर, पश्चिम व दक्षिण विभाग तसेच ठाणे, रायगड व पालघर जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांना शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मुख्याध्यापकांनी दुय्यम सेवा पुस्तक व प्रत्येक महिन्याची वेतन स्लिप (Salary Slip) देण्याचे आदेश दिलेले आहे.
सर्विस बुक हा शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा महत्वाचा दस्तऐवज असतो. या मध्ये वेतनश्रेणी, इन्क्रीमेंट, घेतलेले प्रशिक्षणे, शैक्षणिक अहर्ता वाढविणे, किरकोळ रजा, वैद्यकीय रजा, वेतन आयोगांचे स्टॅम्पिंग आदी महत्वाच्या नोंदी असतात तर सॅलरी स्लिप मध्ये मूळ वेतन, डीए, घरभाडे, वाहतूक भत्ता व अन्य कपात याचा समावेश असल्याने शिक्षकांना हे दोन्ही दस्तऐवज महत्वाचे आहेत, निवृत्तीच्या वेळी सर्विस बुक ग्राह्य धरले जाते त्यामुळे याची दुय्यम प्रत शिक्षकाजवळ असणे गरजेचे असल्याचे अनिल बोरनारे यांनी सांगितले.
शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना दुय्यम सेवा पुस्तक व वेतन स्लिप मिळणे हा त्यांचा हक्क आहे व अशी तरतूद महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवा शर्ती नियमावली 1981च्या नियम 11 मध्ये देखील आहेत परंतु त्याची अंमलबजावणी अनेक शाळांमध्ये केली जात नसल्याने शिक्षण उपसंचालकांकडे तक्रार केली होती. या आदेशाचा फायदा मुंबईसह ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्यातील हजारो शिक्षक-शिक्षकेतरांना होणार आहे असंही भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी सांगितलं.
ठाणे, पालघर, रायगड व मुंबईतील हजारो शिक्षकांना मोठा दिलासा