जेईई ॲडव्हान्स 2022 : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) रविवार, 28 ऑगस्ट रोजी संयुक्त प्रवेश परीक्षा-ॲडव्हान्स २०२२ आयोजित करणार आहे. इंजिनीअरिंगची प्रवेश परीक्षा अवघ्या दोन आठवड्यांवर येऊन ठेपली आहे. विद्यार्थी सध्या त्यांच्या अंतिम टप्प्याची तयारी करत आहेत. विद्यार्थ्यांची तयारी सुधारण्यासाठी, तज्ञांनी दिलेल्या काही टिप्स आहेत ज्याचा वापर तुम्हाला नक्की होऊ शकतो, ज्यामुळे विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी चांगले गुण मिळू शकतात. तज्ज्ञांच्या मते, विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी शेवटच्या क्षणी करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आतापर्यंत अभ्यासलेल्या सर्व विषयांचा सराव आणि उजळणी करणे. याशिवाय जेईई ॲडव्हान्स्ड (JEE Advanced) परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांनी सतत मॉक टेस्ट (Mock Test) द्याव्यात आणि त्यांचे विश्लेषण करावे. या माध्यमातूनच परीक्षेत यश मिळवता येणार आहे.
JEE Advanced 2022 : तयारीसाठी तज्ज्ञांनी दिल्या महत्त्वाच्या टिप्स
- वेळेचं व्यवस्थापन : विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या तयारीसाठी वेळापत्रक बनवून त्याचं रोज पालन करावं.
तज्ज्ञांच्या मते जेईई ॲडव्हान्स्डसारख्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी दिवसातून किमान 5 ते 6 तासांचा अभ्यास अनिवार्य आहे.
- मॉक टेस्ट/मॉक टेस्ट उजळणी पेपर : जेईई ॲडव्हान्स्डपूर्वी मॉक टेस्टमध्ये बदल केल्यास विद्यार्थ्यांना परीक्षेच्या पॅटर्नची ओळख होऊ शकेल. विद्यार्थ्यांनी आपल्या चुका सुधारण्यासाठी प्रत्येक मॉक टेस्टनंतर परीक्षेचे विश्लेषण करणे आवश्यक आहे.
- वेग आणि अचूकता : विद्यार्थ्यांना ठराविक मुदतीत परीक्षा पूर्ण कराव्या लागतात. त्यामुळे त्यांनी परीक्षेसाठी आपला वेग कायम ठेवणे गरजेचे आहे. मात्र, वेग राखण्याबरोबरच विद्यार्थ्यांनी अचूकतेकडेही लक्ष द्यायला हवे, कारण जास्तीत जास्त योग्य प्रश्न सोडवले तरच अधिक गुण मिळू शकतात. जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षेतही निगेटिव्ह मार्किंग आहे. त्यामुळे मर्यादित वेळेत प्रश्नांचा सराव केल्यास विद्यार्थ्यांमध्येही अचूकता येईल.
- स्टडी मटेरियल : विद्यार्थ्यांनी आत्ता इतक्या कमी वेळेत कोणतंही नवीन पुस्तक सुरू करू नये. मात्र, काही संकल्पना समजून घेण्यासाठी विद्यार्थी काही नवीन पुस्तकांचा वापर करू शकतात. या वेळेचा उपयोग विद्यार्थ्याने समस्या सोडवण्यासाठी, शॉर्ट कट्स तयार करण्यासाठी, फॉर्म्युले लक्षात ठेवण्यासाठी आणि त्यांचे प्लस पॉईंट्स आणि निगेटिव्ह पॉईंट्स समजून घेण्यासाठी केला पाहिजे.
जेईई ॲडव्हान्स्डमध्ये पेपर 1 आणि पेपर 2 असे दोन पेपर असून, ते दोन शिफ्टमध्ये घेण्यात येणार आहेत. पेपर 1 सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत, तर पेपर 2 दुपारी 2.30 ते 5.30 या वेळेत होणार आहे.