महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीच्या परीक्षा राज्यभरात घेण्यात आल्या. गेल्या कित्येक दिवसांपासून विद्यार्थी या परीक्षेच्या निकालाची वाट पाहताना दिसले. राज्यात दहावीची परीक्षा 1 मार्च ते 26 मार्च 2024 यादरम्यान पार पडल्या. आता दहावीच्या निकालाबद्दल महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मोठी माहिती देण्यात आलीये. बोर्डाच्या अध्यक्षांनी दहावीचा निकाल नेमका कधी लागणार याबद्दल माहिती सांगितली आहे. आता विद्यार्थ्यांची निकालाची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले की, यंदा दहावीचा निकाल हा मेच्या चाैथ्या आठवड्यात लागेल. अगोदर बारावीचा निकाल लागेल आणि त्यानंतर लगेचच पुढच्या आठवड्यात दहावीचा निकाल हा जाहीर केला जाईल. आता दहावीच्या विद्यार्थ्यांमधील उत्सुकता अधिक वाढल्याचे बघायला मिळतंय.
बोर्डाकडून हे आता स्पष्ट करण्यात आलंय की, दहावीचा निकाल चाैथ्या आठवड्यात जाहीर केला जाईल. मात्र, अजूनही दहावीच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली नाहीये. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वेब साईटवर आपण दहावीचा निकाल पाहू शकतो. यासाठी विद्यार्थ्यांकडे परीक्षा क्रमांक असणे आवश्यक आहे.
mahahsscboard.in, mahresult.nic.in, msbshse.co.in या साईटवर जाऊन विद्यार्थी आपला दहावीचा निकाल पाहू शकतात. यंदा देखील बोर्डाकडून काॅपीमुख्य परीक्षा घेण्यासाठी मोठी तयारी करण्यात आली होती. राज्यात कॉपीमुक्त दहावीची परीक्षा पार पडलीये. भरारी पथकांच्या संख्येत देखील बोर्डाकडून मोठी वाढ करण्यात आली होती.
यंदाच्या दहावीच्या निकालात मुले बाजी मारतात की, मुली बाजी मारतात हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे. दहावीच्या निकालाचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे देखील सांगितले जातंय. 16 लाख 9 हजार 444 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिलीये. आता लवकरच मेच्या चाैथ्या आठवड्यातील कोणत्या दिवशी निकाल जाहीर होईल, हे स्पष्ट करण्यात येईल.