दहावी निकालानंतरच्या पुढील वाटा: ITI चे 91 अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना करतील आत्मनिर्भर

| Updated on: Jul 18, 2021 | 12:37 PM

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्यच्या https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर आयटीआयची प्रवेशप्रक्रिया सुरु झाली आहे.

दहावी निकालानंतरच्या पुढील वाटा: ITI चे 91 अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना करतील आत्मनिर्भर
ITI
Follow us on

मुंबई: दहावीचा यंदाचा निकाल 99.95 टक्के जाहीर झाला आहे. कोकण विभागाचा निकाल 100 टक्के, मुलांचा निकाल 99.94 टक्के, तर मुलींचा निकाल 99.96 टक्के आहे. दहावीच्या परीक्षेला नोंदणी केलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी 15 लाख 74 हजार 994 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यातील नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी 6 लाख 48 हजार 683 विद्यार्थी प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. मोठ्या संख्येंनं विद्यार्थी पास झाल्यानं अकरावी प्रवेशाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा देखील घेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना आयटीआयला प्रवेश घेणं अधिक योग्य ठरु शकतं. दहावी उत्तीर्ण आणि अनुत्तीर्ण विद्यार्थी आयटीआयच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊन, रोजगारासाठी आवश्यक असणारं कौशल्य मिळवू शकतात. आयटीआय केल्यानंतर स्वत:चा व्यवसाय देखील सुरु करु शकतात. सध्या आयटीआयची प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. विद्यार्थ्यांनी आयटीआयचा करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यातील पाया म्हणून पाहाणं आवश्यक आहे.

एकूण 91 प्रकारचे व्यवसाय अभ्यासक्रम उपलब्ध

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्यच्या https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर आयटीआयची प्रवेशप्रक्रिया सुरु झाली. एकूण 91 प्रकारचे व्यवसाय अभ्यासक्रम उपलब्ध असून 80 अभ्यासक्रमांसाठी दहावी उत्तीर्ण तर 11 अभ्यासक्रमांसाठी दहावी उत्तीर्ण वा अणुत्तीर्ण उमेदवार पात्र आहेत. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनासुद्धा कौशल्य प्रशिक्षण मिळून त्यांनी स्वत:च्या पायावर उभे रहावे यासाठी त्यांना 11 अभ्यासक्रमांमध्ये संधी देण्यात आली आहे.

प्रवेश अर्ज MahaITI App आधारे भरण्याची सुविधा

प्रवेश प्रक्रिया, नियमावली, पद्धती, आवश्यक कागदपत्रे, संबंधित शासन निर्णय, विविध योजना, संस्थांची यादी, अभ्यासक्रम, प्रवेश पात्रता, इत्यादींबाबत इत्यंभूत माहिती https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येत आहे. हरकती नोंदविणे, विकल्प अर्ज भरणे, ऑनलाईन स्वरुपात प्रवेश अर्ज शुल्क भरणे इत्यादी सुविधा अर्जदारांना उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तसेच प्रवेश अर्ज “MahaITI App” या मोबाईल ॲपच्या आधारे भरण्याची सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात येत आहे. राज्यातील इच्छूक पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज करावेत, असे आवाहन मंत्री मलिक यांनी केले.

358 तालुक्यात 417 शासकीय आयटीआय

राज्यात प्रत्येक तालुक्यात किमान 01 शासकीय आयटीआय सुरु करण्यात आले आहे. त्यानुसार 358 तालुक्यात 417 शासकीय आयटीआय आहेत. त्यामध्ये आदिवासी भागात आदिवासींसाठी 61 संस्था, अनुसूचित जाती व नवबौध्दांच्या मुलामुलींसाठी 04 उच्चस्तर संस्था, अल्पसंख्याकांसाठी स्वतंत्र 02 संस्था व 43 शासकीय आयटीआमध्ये स्वतंत्र तुकड्या, महिलांसाठी 15 तर 28 आदिवासी आश्रमशाळा आयटीआय अशा संस्थांचा समावेश आहे. याचबरोबर राज्यात एकूण 549 खाजगी आयटीआय आहेत.

केंद्रीय पद्धतीनं ऑनलाईन प्रवेश

सन 2013 मध्ये शासकीय आयटीआय संस्थेतील प्रवेशप्रक्रीया व सन 2015 मध्ये खासगी आयटीआय संस्थेतील प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय व महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य करारामुळे मंडळाकडून सर्व परीक्षार्थ्यांची माहिती संचालनालयास उपलब्ध करुन देण्यात आली आहे. आयटीआय संस्थेत प्रवेश अर्ज भरताना उमेदवारांनी त्यांचा इयत्ता दहावी परिक्षेचा बैठक क्रमांक (Seat Number) नमुद केल्यास त्यांची वैयक्तिक व इयत्ता दहावीच्या परिक्षेतील गुण याबाबत सर्व माहिती प्रवेश अर्जात आपोआप नमुद होईल (Auto Populate). तसेच ज्या उमेदवारांनी इतर मंडळांमार्फत इयत्ता दहावी परीक्षा दिली असेल त्यांना त्यांची सर्व माहिती प्रवेश अर्जात नमुद करावी लागेल. प्रवेश अर्ज शुल्क भरण्यासाठी प्रवेश संकेतस्थळावर सर्व ऑनलाईन पेमेंट माध्यमे उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. उमेदवारांना प्रमाणपत्रे तपासणी, प्रवेश अर्ज शुल्क भरणे व प्रवेश अर्ज निश्चितीसाठी कोणत्याही आयटीआय संस्थांमध्ये प्रत्यक्ष जाण्याची आवश्यकता नाही.

आयटीआय प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा न घेता संबंधित मंडळांनी निर्गमित केलेल्या दहावीच्या गुणपत्रिकेतील गुण व प्रवेश नियमावलीनुसार निर्धारित गुणाधिक्य याआधारे सर्वसाधारण गुणवत्ता यादी तयार करुन निर्धारित प्रवेश नियमावली व पध्दतीनुसार प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

शिकाऊ उमेदवारी योजनेतून विद्यावेतन

युवकास आवश्यक असलेले पायाभूत प्रशिक्षण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये दिल्यानंतर औद्योगिक आस्थापनेत वापरण्यात येणारी यंत्रसामुग्री व तंत्र यांचे ज्ञान व कौशल्य प्राप्त करुन सर्व दृष्टीने पूर्ण कुशल बनावा यासाठी शिकाऊ उमेदवारी योजना अस्तित्वात आली. शिकाऊ उमेदवारांना केंद्र शासनाने मंजूर केलेल्या दरानुसार प्रशिक्षण कालावधीमध्ये विद्यावेतन मिळते. या योजनेअंतर्गत राज्यातील साधारण 11 हजार औद्योगिक आस्थापनांमध्ये शिकाऊ उमेदवारांच्या एकूण 1 लक्ष जागा स्थित करण्यात आलेल्या आहेत. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांपेक्षा शिकाऊ उमेदवारीसाठी उपलब्ध जागा अधिक असल्याने प्रत्येक उत्तीर्ण उमेदवारास संधी उपलब्ध आहे.

बारावी समकक्षता

इयत्ता दहावी उत्तीर्ण उमेदवारांनी आयटीआयमधून 2 वर्षे कालावधीच्या व्यवसाय अभ्यासक्रमात प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निर्धारित केलेल्या 2 भाषा विषयांची परीक्षा उत्तीर्ण केल्यास उमेदवारास इयत्ता बारावीची समकक्षता देण्यात येणार आहे. तसेच इयत्ता दहावी अनुत्तीर्ण उमेदवारांनी आयटीआयमधून 2 वर्षे कालावधीच्या व्यवसाय अभ्यासक्रमात प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निर्धारित केलेल्या 2 भाषा विषयांची परीक्षा उत्तीर्ण केल्यास उमेदवारास इयत्ता दहावीची समकक्षता देण्यात येणार आहे. आयटीआय संस्थांमधील प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना पदविका अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्गात थेट प्रवेश दिला जातो.

इतर बातम्या:

SSC GD Notification 2021: एसएससी जीडी कॉन्स्टेबल भरतीचं नोटिफिकेशन जारी, 25 हजार जागा, 10 वी पास उमेदवारांसाठी मोठी संधी

असिस्टंट मॅनेजर ते टेक्निशियनच्या पदांसाठी नोकरी, आजच अर्ज करा…

Maharashtra SSC Result Declared ITI admission is best option for earning within few years