बोर्डाच्या परीक्षा किंवा कोणतीही स्पर्धा परीक्षा, त्यांच्यासाठी कितीही सुरक्षा ठेवली तरी कुठे तरी कमी पडतंच, तरीही विद्यार्थी कॉपी करतातच. ही कॉपी थांबवण्यासाठी शाळा प्रशासन आणि शिक्षकांना कसरत करावी लागतीये. ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र मंडळाने एक आगळीवेगळी मोहीम सुरू केलीये. वास्तविक, बोर्डाच्या परीक्षेदरम्यान फसवणुकीसारख्या घटना रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) विद्यार्थ्यांनाच नावीन्यपूर्ण कल्पना मांडण्यास सांगितले आहे.
महाराष्ट्र मंडळाकडून याबाबत थेट स्पर्धाच सुरू करण्यात आलीये. या काळात विद्यार्थी, पालक आणि शैक्षणिक संघटनांसह इतरांकडून परीक्षेदरम्यान होणारी फसवणूक रोखण्यासाठी नवनवीन मार्गांबाबत सूचना मागविण्यात आल्या आहेत.
इच्छुक व्यक्ती त्याच्या वैयक्तिक तपशीलांसह त्याची कल्पना सबमिट करू शकते. अधिक माहितीसाठी उमेदवार महाराष्ट्र मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. इथे नोटिफिकेशन सेक्शनमध्ये तुम्हाला या संदर्भातील माहिती मिळेल.
स्पर्धा जिंकणाऱ्याची कल्पना बोर्डाच्या परीक्षेत लागू होईल. बोर्डाने जारी केलेल्या अधिकृत सूचनेनुसार, सर्वात नाविन्यपूर्ण, व्यावहारिक आणि वापरण्यास सुलभ अशा कल्पना विजेत्या म्हणून निवडल्या जातील.
ज्यांच्या कल्पना निवडल्या जातील, त्यांना त्याचे बक्षीसही मिळणार आहे. स्पर्धेत निवड झालेल्या कल्पनांचा अवलंब महाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षेदरम्यान केला जाणार आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षा फेब्रुवारी आणि मार्च 2023 मध्ये होणार आहेत.
महाराष्ट्र राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, “एकूण नऊ विभाग आहेत ज्याद्वारे महाराष्ट्र राज्य मंडळाच्या परीक्षा घेतल्या जातात. राज्य मंडळाने जारी केलेल्या एकसमान मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे, परीक्षेच्या काळात होणारी फसवणूक पकडण्यासाठी किंवा रोखण्यासाठी प्रत्येक विभागाची स्वतःची कृती योजना असते. यासाठी सर्वसमावेशक राज्यस्तरीय नियोजन निश्चित करण्यासाठी सगळ्यांच्या प्रयत्नांची गरज आहे.”
महाराष्ट्र राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी म्हणाले, ‘बदलत्या काळानुसार बोर्डाच्या परीक्षेत होणारी फसवणूक थांबविण्यासाठी, स्वतःच्या प्रयत्नाने परीक्षा देणाऱ्यांवर अन्याय होऊ नये, यासाठी नवा दृष्टिकोन समोर आणण्याची गरज आहे.’