मुंबई: अनेक विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन शिक्षण घ्यायची प्रचंड इच्छा असते. बारावी झाली की मुलं पुढचा विचार करू लागतात. जर तुम्हीही असे विद्यार्थी असाल तर तुम्हाला बांगलादेशात जाऊन एमबीबीएस करण्याची संधी आहे. भारतीय विद्यार्थ्यांमध्ये परदेशात शिक्षणासाठी बांगलादेश हे लोकप्रिय ठिकाण नसले तरी सुद्धा हे नक्कीच असं ठिकाण आहे जिथे वैद्यकीय विद्यार्थी शिकायला नक्की जातात. या विद्यार्थ्यांना दक्षिण आशियात राहावं लागतं. भारत सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार 2022 मध्ये बांगलादेशात शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या 9,308 होती.
या 9000 भारतीय विद्यार्थ्यांपैकी 922 विद्यार्थ्यांनी फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झामिनेशन (FMGE) मध्ये भाग घेतला. 370 जण वैद्यकीय तपासणी चाचणीतही उत्तीर्ण झाले. बांगलादेशातून एमबीबीएस करण्यासाठी पात्रता निकष काय आहेत, अभ्यासक्रमाचे शुल्क काय आहे, प्रवेश कसा घ्यावा हे जाणून घेऊया.
बांगलादेशातील बॅचलर ऑफ मेडिसिन अँड बॅचलर ऑफ सर्जरी (एमबीबीएस) अभ्यासक्रम पाच वर्षांचा आहे. एक वर्षाची इंटर्नशिपही करावी लागणार आहे. पदवी मिळवण्यासाठी सर्व वैद्यकीय विद्यार्थ्यांना इंटर्नशिपचे वर्ष पूर्ण करणे आवश्यक आहे.
बांगलादेशात सर्व विद्यापीठे इंग्रजीतून शिकवली जातात. इंग्रजी व्यतिरिक्त देशाची स्थानिक भाषा बंगाली आहे. अशा तऱ्हेने थोडीफार बंगाली येत असेल तर तिथे राहणं सोपं होईल.