राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र एमएचटी सीईटी 2022 चे प्रवेशपत्र (MHT CET Admit Card 2022) आज, 26 जुलै रोजी जारी करणार आहे. परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी पीसीएम चे (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित) हॉलतिकीट दुपारी २ वाजेपर्यंत मिळू शकतं, याची नोंद घ्यावी. एकदा प्रवेशपत्र जाहीर झाल्यानंतर, उमेदवार ते mhtcet2022.mahacet.org आणि cetcell.mahacet.org परीक्षा पोर्टलवरून डाउनलोड करू शकतात. सीईटी सेलने (CET Cell) ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार इंजिनीअरिंग पीसीएम गटासाठी एमएचटी सीईटी 5 ते 11 ऑगस्ट या कालावधीत घेण्यात येणार आहे. तर पीसीबी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र) गटाची परीक्षा 12 ते 20 ऑगस्ट 2022 या कालावधीत होणार आहे. पीसीबीसाठी (Physics,Chemistry,Biology PCB Admit Card 2022) प्रवेशपत्रे 8 ऑगस्ट रोजी दिली जातील.
विद्यार्थ्यांनी त्यांच्या एमएचटी सीईटी 2022 प्रवेश कार्डवरील सर्व तपशील काळजीपूर्वक तपासणे आवश्यक आहे. तुमच्या एमएचटी सीईटी प्रवेशपत्रावर काही तफावत किंवा त्रुटी असल्यास उमेदवारांनी संबंधित अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधावा. यानंतर, सीईटी सेल संबंधित उमेदवारांना त्यांच्या एमएचटी सीईटी हॉल तिकिटात समस्या असल्यास भरण्यासाठी एक हमीपत्र सादर करेल.
इंजिनीअरिंग (Engineering), फार्मसी आणि इतर संलग्न अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएचटी सीईटी घेतली जाते. या सेलमध्ये आर्किटेक्चर अँड प्लॅनिंग, हॉस्पिटॅलिटी, लॉ आणि मॅनेजमेंटसह इतर अनेक अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट प्रवेश परीक्षा घेण्यात येतात. सीईटी सेल महाराष्ट्र राज्य कोट्यातील जागांसाठी एनईईटी समुपदेशन देखील आयोजित करते.