महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (MSBSHSE) लवकरच बारावीचा निकाल (12th Result) जाहीर होणार आहे. माहितीनुसार, या परीक्षेचा निकाल जूनच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होऊ शकतो. परीक्षेचा निकाल ऑनलाइन जाहीर (Online Result) होणार आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या www.mahahsscboard.in अधिकृत वेबसाइट किंवा महाराष्ट्र निकाल पोर्टलला www.mahresult.nic.in भेट देऊन विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बोर्डाच्या उत्तरपत्रिका तपासणीस नकार देणाऱ्या काही शिक्षकांनी संप पुकारल्यामुळे मूल्यांकन प्रक्रिया लांबणीवर पडली होती. असे असले तरी परीक्षेचे निकाल बोर्डाकडून वेळेत जाहीर केले जाणार आहेत. महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतरच शिक्षकांनी संप मागे घेतला, त्यानंतरच मूल्यांकन प्रक्रिया पुन्हा सुरू होऊ शकली.
महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बारावीचा निकाल 10 जून 2022 पर्यंत लागण्याची शक्यता आहे. बारावीच्या परीक्षांच्या मूल्यमापनाचे काम 28 मेपर्यंत पूर्ण करता येणार आहे. पुढच्या आठवड्यात परीक्षेचा निकाल तयार करून तो वेबसाईटवर अपलोड केला जाणार आहे. अशा परिस्थितीत जूनच्या दुसऱ्या आठवड्यात 10 जूनला बारावीचा निकाल जाहीर होऊ शकतो. त्याचबरोबर दहावीचा निकाल 20 जून 2022 रोजी जाहीर होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) 2022-23 या सत्रासाठी बोर्डाच्या परीक्षांचा पॅटर्न जाहीर केला आहे. जारी करण्यात आलेल्या पॅटर्ननुसार पर्यायी प्रश्न 50 टक्क्यांवरून 20 टक्के करण्यात आले आहेत. त्यामुळे आता तरी परीक्षेत असेच विद्यार्थी पास होऊ शकणार आहेत जे रट्टा मारण्यापेक्षा समजून घेऊन अभ्यास करण्याला प्राधान्य देतात. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर मोठा परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर बोर्डाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेत अत्यंत सोप्या प्रश्नपत्रिका देण्यात येत होत्या. मात्र, आता परिस्थिती पूर्ववत झाल्याने बोर्डाने पुन्हा जुन्याच पॅटर्नवर परतण्याचा निर्णय घेतला आहे.