मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात जोरदार पाऊस सुरु आहे. अतिवृष्टीचा (Heavy Rains) तडाखा बऱ्याच भागांना बसलेला आहे. जून, जुलै महिने शिक्षण विभागासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. परीक्षा, निकाल, महाविद्यालयीन प्रवेश या सगळ्या घडामोडींचा हा महिना. अतिवृष्टीमुळे आता शिक्षण विभागावर (Education Department) सुद्धा परिणाम होताना दिसून येतोय. राज्यात अनेक भागात अतिवृष्टीच्या कारणास्तव खबरदारीचा उपाय म्हणून शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. मुलांच्या शिष्यवृत्त्या, अनेक विद्यापीठांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. अतिवृष्टीमुळे मुंबई विद्यापीठाने (Mumbai University) परीक्षा रद्द केलेल्या होत्या. त्या परीक्षांची नवीन तारीख जाहीर झाली आहे. परीक्षेची केंद्रे आधीसारखीच राहणार आहेत.
अतिवृष्टीमुळे मुंबई विद्यापीठाने 14 जुलै रोजीच्या सर्व परीक्षा रद्द केल्या होत्या. त्या परीक्षा 18 आणि 19 जुलै रोजी घेण्यात येणार आहेत. इंजिनीयरिंग, फार्मसी आणि एमएससी फायनान्स या विषयांच्या नऊ परीक्षांचा त्यात समावेश आहे. या परीक्षेची केंद्रे यापूर्वी जी होती तीच राहणार आहेत. कम्युनिकेशन स्कील्स, प्रोफेशनल कम्युनिकेशन एथिक्स 1, फायनान्शियल अकाऊंटिंग ॲण्ड मॅनेजमेंट, इंटरप्रिन्युअरशिप मॅनेजमेंट, बिझनेस इन्फ्रास्ट्रक्चर ॲण्ड मॅनेजमेंट, ईआरपी, एथिक्स ॲण्ड सीएसआर, फिक्स्ड इन्कम सिक्युरिटीज या विषयांच्या परीक्षा 18 जुलै रोजी होणार आहेत. क्लिनिकल इम्युनोलॉजी ॲण्ड इम्युनोपॅथॉलॉजी या विषयाची परीक्षा 19 जुलै रोजी होणार आहे.
संशोधन आणि अभ्यास करून डॉक्टरेट पदवी मिळविण्याची विद्यार्थ्यांची इच्छा मुंबई विद्यापीठाच्या हलगर्जीपणामुळे अपुरी राहतीये. कोणत्या विभागामध्ये किती जागा उपलब्ध आहेत. मार्गदर्शकांची संख्या किती आहे. त्यांच्याकडील विषय कोणते याबाबत माहिती मिळविताना विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय असा आरोप युवासेना सिनेट सदस्य ॲड. वैभव थोरात यांनी ,केला आहे. पेट परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पुढे काय करायचे, असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभा राहिला आहे. कारण पेटनंतर पुढील प्रक्रियेसाठी विद्यापीठामध्ये मार्गदर्शन केंद्रच नाही. विद्यापीठ वगळता काही महाविद्यालयांमध्येही पीएचडी सेंटर आहेत. अशा महाविद्यालयांची माहिती विद्यार्थ्यांना उपलब्ध करावी, त्याचबरोबर विद्यापीठाच्या वेबसाइटवर माहिती द्या, अशी मागणी थोरात यांनी केली.