मुंबई: मराठी भाषा (Marathi Language) प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही जर अमराठी असाल आणि तुम्हाला मराठी शिकायची आवड असेल तर तुम्हाला आता मराठी शिकण्यासाठी चांगली सुविधा उपलब्ध होणार आहे. मुंबई विद्यापीठ (Mumbai University) आता मराठी प्रमाणपत्र अभ्यासक्रम राबविणार आहे. या अभ्यासक्रमासाठी ऑफलाइन, ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया सुरू असून विद्यार्थी 15 जुलैपर्यंत प्रवेश घेऊ शकतात. देशाच्या कानाकोपऱ्यातून मुंबईत अनेक लोक शिक्षण, व्यवसाय, नोकरी आणि इतर कारणास्तव वास्तव्यासाठी येत असतात; मात्र मराठी भाषा येत नसल्याने त्यांना या शहरात वावरताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशा लोकांसाठी मुंबई विद्यापीठ मराठी प्रमाणपत्र अभ्यासक्रम (Certificate Course For Marathi Language) राबवीत आहे.
महाराष्ट्रात मराठी ही व्यवहार भाषा आहे. त्यामुळे या भाषेत संवाद साधणे आवश्यक आहे. मराठी अभाषिकांचा संवाद वाढावा आणि मराठी भाषेशी त्यांचे नाते अधिक घट्ट व्हावे यासाठीच विद्यापीठाच्या मराठी विभागाने अभाषिकांसाठी मराठी प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला आहे. मराठी शिकण्याची इच्छा असणाऱ्यांना या अभ्यासक्रमाचा नक्कीच फायदा होईल. इथल्या मातीशी, इथल्या भाषेशी आणि संस्कृतीशी त्यांचे नाते अधिक घट्ट व्हावे हा या अभ्यासक्रमाचा हेतू आहे. मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागाला नुकतीच 50 वर्षे पूर्ण झाली आहेत.
इच्छुक उमेदवार मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागात किंवा अन्य दोन केंद्रावर जाऊन प्रवेश घेऊ शकतात
Parttimecourses.mu.ac.in या लिंकवर जाता येईल.