मुंबई: देशातील सर्वात जुन्या दंत महाविद्यालयांमध्ये दुस-या क्रमांकाचे रुग्णालय असा नावलौकिक असणा-या आणि दरवर्षी तब्बल साडेतीन लाखांपेक्षा अधिक रुग्णांवर परिणामकारक दंतोपचार करणा-या मुंबई महानगरपालिकेच्या नायर दंत महाविद्यालयाच्या शैक्षणिक व सोयी-सुविधा विषयक कामगिरीची दखल नुकतीच 2 राष्ट्रीय स्तरावरील सर्वेक्षणांमध्ये घेण्यात आली आहे. या अंतर्गत ‘आऊटलुक’ साप्ताहिकाने देशभरातील सार्वजनिक क्षेत्रातील दंत महाविद्यालयांमध्ये तिसरे स्थान देत आपल्या महापालिकेच्या नायर दंत महाविद्यालयाचा गुणगौरव केला आहे. तर ‘द वीक’ या नियतकालिकाने देशभरातील सर्वोत्कृष्ट दंत महाविद्यालयांमध्ये नायर दंत महाविद्यालयाला पाचवे स्थान दिले आहे. या अनुषंगाने महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल व अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांनी नायर दंत महाविद्यालयाच्या टीमचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत.
एकाचवेळी राष्ट्रीय स्तरावरील 2 वेगवेगळ्या सर्वेक्षणांमध्ये नायर रुग्णालय अग्रेसर ठरलं आहे. नायर दंत महाविद्यालयाच्या शैक्षणिक कामगिरीसह तेथील सुविधांचा देखील राष्ट्रीय स्तरावर गौरव झाला असल्याचे डॉ. नीलम अंद्राडे म्हणाल्या आहेत. मार्च 2020 पासून उद्भवलेल्या कोविड काळात नायर दंत महाविद्यालय आणि दंत रुग्णालय अव्याहतपणे कार्यरत आहे. कोविड सारख्या साथरोगाच्या परिस्थितीत दंत वैद्यकीय सेवा देताना साथरोगाचा संसर्ग होऊ नये, या दृष्टीने आत्यंतिक काळजी घेणे क्रमप्राप्त आहे. मात्र, हे आव्हान नायर दंत महाविद्यालयातील विद्यार्थी – कामगार – कर्मचारी – अधिकारी आणि प्राध्यापक व शिक्षक मंडळी समर्थपणे हाताळत आहेत. अधिकाधिक नाविण्यपूर्ण व गुणवत्तेला प्राधान्य देणा-या सेवांचा नियमितपणे विस्तार करणा-या नायर दंत महाविद्यालयात एकावेळी 350 पेक्षा अधिक विद्यार्थी दंत वैद्यकीय बाबींचे शिक्षण घेत असतात. यामध्ये 5 वर्षीय पदवी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आणि 3 वर्षीय पदव्युत्तर दंत वैद्यकीय अभ्यासक्रमाचे विद्यार्थी, अशा दोन्ही अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्यासाठी 57 प्राध्यापक या महाविद्यालयात कार्यरत आहेत.
देशभरातील शासकीय आणि खासगी क्षेत्रातील दंत महाविद्यालयांच्या शैक्षणिक कामगिरीसह विविध स्तरीय मूल्यमापन करुन त्यातून सर्वोत्कृष्ट दंत महाविद्यालयांची निवड करण्यासाठी यंदाच्या वर्षी जी २ वेगवेगळी सर्वेक्षणे करण्यात आली, त्यामध्ये नायर दंत महाविद्यालयाचा गुणगौरव करण्यात आला आहे. राष्ट्रीय स्तरावर करण्यात आलेली ही सर्वेक्षणे २ नामांकित नियतकालिकांच्या पुढाकाराने करण्यात आली. या सर्वेक्षणासाठी देशातील दंत महाविद्यालयांची सर्वंकष माहिती, बहुस्तरीय कामगिरी, उपलब्ध पायाभूत सुविधा, शैक्षणिक सुविधा आणि त्यांची गुणवत्ता, शिक्षणातील वैविध्य, संस्थेकडून आयोजित केले जाणारे उपक्रम, संशोधन, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रकाशित प्रबंध व निबंध, शिक्षण पूर्ण करुन बाहेर पडणा-या विद्यार्थ्यांना मिळणा-या व्यवसायिक संधी अशा वेगवेगळ्या निकषांचा विचार करुन हे मूल्यांकन करण्यात आले.
मुंबई महानगरपालिकेच्या नायर दंत महाविद्यालय आणि रुग्णालयाची स्थापना सन 1933 मध्ये झाली. येत्या 18 डिसेंबर रोजी 88 व्या वर्षात पदार्पण करत असलेले हे रुग्णालय देशातील सर्वात जुने असे दुस-या क्रमांकाचे दंत रुग्णालय व महाविद्यालय आहे. दरवर्षी सुमारे साडेतीन लाख रुग्णांना वैद्यकीय सेवा देणा-या या रुग्णालयात 9 ‘सुपरस्पेशालिटी’ विभाग आहेत. दातांवरील उपचारांमध्ये अद्ययावत आणि सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञानासह वैद्यकीय सेवा देणा-या या महाविद्यालयात संबंधित उपचारांसाठी 187 डेंन्टल चेअर असून, उपचारासाठी भरती होणा-या रुग्णांसाठी २० खाटांचा अद्ययावत विभाग देखील आहे. विशेष म्हणजे स्वतंत्र व समर्पित शस्त्रक्रियागृह (Operation Theatre) असणारे हे देशातील एकमेव दंत महाविद्यालय आहे.
इतर बातम्या:
Narayan Rane : ते असताना संपवू शकले नाहीत, नसताना काय संपवणार? राणेंच्या यात्रेत पोस्टर
Nair Dental College Mumbai got third and five place in survey of Outlook and The Week