नवी दिल्ली: देशभरातील शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीनं नॅशनल ॲचिव्हमेंट सर्वे घेण्यात येत आहे. आज हा सर्वे होणार आहे. नॅस अंतर्गत देशभरातील तिसरी, पाचवी, आठवी आणि दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला जातो. यावर्षी हा सर्वे देशभरातील 36 राज्यातील 733 जिल्ह्यातील 1.23 लाख शाळांमध्ये होणार आहे. तर,यामध्ये एकूण 38 लाख विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
नॅशनल ॲचिव्हमेंट सर्वेक्षण दर तीन वर्षांनी करण्यात येते. यापूर्वीचा सर्वे 2017 मध्ये करण्यात आला होता. 2020 मध्ये नियोजित वेळेप्रमाणं सर्वेक्षण होणं आवश्यक होतं. मात्र, कोरोना विषाणू संसर्गामुळं सर्वेक्षण लांबणीवर पडलं होतं. अखेर नॅशनल अॅचिव्हमेंट सर्वेक्षण आज होत आहे.
देशभरातील 36 राज्यातील 1.23 लाख शाळांचा समावेश हा नॅस सर्वेक्षणात असेल, अशी माहिती केंद्रीय शिक्षण विभागाच्यावतीनं देण्यात आली आहे. नॅस सर्वेक्षणात तिसरी आणि पाचवीच्या वर्गासाठी भाषा विषय, गणित आणि पर्यावरण यासंबंधी विद्यार्थ्यांचं ज्ञान तपासलं जाईल. भाषा विषय, गणित, सामाजिक शास्त्र आणि विज्ञान विषयाची चाचणी आठवीच्या वर्गासाठी घेतली जाईल. तर दहावीच्या वर्गासाठी भाषा विषय, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र आणि इंग्रजी विषयातील विद्यार्थ्यांची प्रगती तपासली जाईल.
नॅशनल अॅचिव्हमेंट सर्वेक्षण हे एकूण 22 माध्यमांमध्ये करण्यात येईल. आसामी, बंगाली, इंग्रजी, गुजराती, हिंदी, कन्नड, मल्याळम, मनिपुरी, मराठी, मिझो, ओडिया, पंजाबी, तामीळ, तेलुगू, उर्दू, बोडो, गारो, खासी, कोंकणी, नेपाळी, भुतिया, लेपचा या भाषांच्या माध्यमामध्ये ही चाचणी घेतली जाईल.
नॅशनल अॅचिव्हमेंट सर्वेक्षणाद्वारे विद्यार्थ्याना अध्ययन प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी समजून घेणे. विद्यार्थ्यांच्या अडचणीवर समजून घेऊन त्यावर मार्ग काढण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. नॅसमध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार, सरकारी अनुदान प्राप्त आणि विनाअनुदानीत शाळा यां सहभागी होणार आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार पूर्वोत्तर भारतातील तिसरी, पाचवी, आठवी आणि दहावीच्या वर्गामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा देखील या नॅसमध्ये समावेश असणार आहे.
इतर बातम्या:
‘वाहतुकीची सोय करा, कोरोना नियम पाळा,’ NAS सर्वेक्षणासाठी 12 नोव्हेंबरला शाळा सुरु ठेवण्याचे आदेश
National Achievement Survey 2021 more than 38 lakh students participate in NAS which is conducted today