कोरोनामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान, ‘ब्रीज कोर्स’ची आखणी करण्याची रोहित पवार यांची मागणी

| Updated on: Nov 18, 2021 | 5:30 PM

असर या संस्थेने दिलेला अहवाल तर चांगलाच धक्कादायक आहे. या अहवालाचा संदर्भ घेत राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार रोहित पवार यांनी गेल्या दोन वर्षांच्या अभ्यासक्रमावर आधारित 'ब्रीज कोर्स'ची आखणी करुन त्या मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली आहे.

कोरोनामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान, ब्रीज कोर्सची आखणी करण्याची रोहित पवार यांची मागणी
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us on

मुंबई : मागील एका वर्षापासून कोरोना महामारीमुळे शिक्षण व्यवस्थेतेचे तीनतेरा झाले आहेत. विद्यार्थांसाठी ऑनालाईन तासिकांचे आयोजन केले गेले. मात्र, इंटरनेट तसेच मोबाईल यांची व्यवस्था नसल्यामुळे मागील एका वर्षापासून ग्रामीण भागात विद्यार्थ्यांची चांगलीच पिछेहाट झाली. असर या संस्थेने दिलेला अहवाल तर चांगलाच धक्कादायक आहे. या अहवालाचा संदर्भ घेत राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार रोहित पवार यांनी गेल्या दोन वर्षांच्या अभ्यासक्रमावर आधारित ‘ब्रीज कोर्स’ची आखणी करुन त्या मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली आहे.

शैक्षणिक प्रवाहात 10.3 टक्के मुलांना सहभागी होता आलं नाही

रोहित पवार यांनी या मागणीला घेऊन शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी ग्रामीण भगातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधेविषयी भाष्य केलंय. “कोरोनाच्या काळात सर्वत्र ऑनलाईन शिक्षण सुरू होतं. मात्र तरीही आवश्यक साधनांअभावी या शैक्षणिक प्रवाहात राज्याच्या ग्रामीण भागातील तब्बल 10.3 टक्के मुलांना सहभागी होता आलं नाही. तसं ‘असर 2021’ च्या अहवालात नमूद करण्यात आलंय. हे प्रमाण मोठं आहे,” असं रोहित पवार यांनी म्हटलंय.

दोन वर्षांच्या अभ्यासक्रमावर ‘ब्रीज कोर्स’ची आखणी करा 

तसेच “या मुलांना शिक्षण न मिळाल्याने भविष्यात अनेक सामाजिक, आर्थिक प्रश्न उद्भवू शकतात. त्यामुळं गेल्या दोन वर्षांच्या अभ्यासक्रमावर ‘ब्रीज कोर्स’ची आखणी करुन त्या माध्यमातून या मुलांना मूळ शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावेत,” अशी मागणी रोहित पवार यांनी वर्षा गायकवाड आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे केलीय.

पहिली ते चौथीचे वर्ग सुरु करण्याच्या हालचाली

दरम्यान, कोरोना विषाणू संसर्ग सुरु झाल्यानंतर शाळा बंद होत्या. राज्य सरकारनं टप्प्याटप्यानं शाळा सुरु केल्या आहेत. आता कोरोनाचं संकट दूर होताना दिसत आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरणात राज्यानं आघाडी घेतली आहे. त्यामुळे पहिली ते चौथीचे वर्ग सुरु करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. राज्य मंत्रिमंडळ आणि टास्क फोर्स यांच्याशी चर्चा झाल्यानंतर शालेय शिक्षण विभाग पहिलीपासून वर्ग सुरु करण्यासंदर्भात अंतिम निर्णय घेऊ शकतो. तशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

इतर बातम्या :

नवाब मलिकांविरोधातल्या याचिकेवर 22 नोव्हेंबरला सुनावणी, समीर वानखेडेंच्या वडीलांची याचिका

एसटी कामगारांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनवाढ द्यायला तयार आहोत… पण; अनिल परबांनी सांगितली समस्या

‘कोट यांची भूमिका हिंदुत्व, मंदिरासाठी महत्त्वाची,’ भाजप आमदाराकडून शिवसेनेच्या माजी नगरसेवकाचे समर्थन, कल्याणमध्ये नेमकं काय घडलं ?