नॅशनल एलिजिबिलिटी एन्ट्रन्स टेस्ट अंडरग्रॅज्युएटची आन्सर कि (NEET UG Answer Key) जाहीर करण्याचा निर्णय या आठवड्याच्या मध्यात होण्याची शक्यता आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (National Testing Agency) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “उत्तर की जारी करण्यासाठी अद्याप कोणतीही तारीख निश्चित केलेली नाही. आम्ही त्यावर काम करत आहोत. एकदा एनईईटी यूजी 2022 (NEET UG 2022) उत्तर की जाहीर झाल्यानंतर, उमेदवार neet.nta.nic.in अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ते डाउनलोड करू शकतात. एनटीए एनईईटी यूजी 2022 उत्तर की संदर्भात आक्षेप घेण्याचा पर्याय देखील उपलब्ध करून देईल. अधिकृत वेबसाइटवर उमेदवारांना तसे करण्याचा पर्याय असेल. त्यासाठी त्यांना neet.nta.nic.in लॉगइन करावं लागतं. आन्सर की संदर्भात घेण्यात आलेल्या आक्षेपाचा आढावा घेतल्यानंतर अंतिम उत्तर की आणि स्कोअरकार्ड या महिन्याच्या अखेरीस प्रसिद्ध करण्यात येणार आहे. नीट यूजी 2022 च्या निकालासोबतच गुणवत्ता यादीही जाहीर करण्यात येणार आहे. नीट यूजी परीक्षा 17 जुलै रोजी घेण्यात आली होती आणि यावर्षी 18 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.
नीट यूजी 2022 पर्सेंटाइल हे ‘नीट’मधील ऑल इंडिया कॉमन मेरिट लिस्टमध्ये मिळालेल्या सर्वाधिक गुणांच्या आधारे निश्चित करण्यात येणार आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांना किमान 50 पर्सेंटाइल आणावे लागणार आहे. अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना किमान 40 पर्सेंटाइल गुण मिळवावे लागतील. त्याचबरोबर अपंग विद्यार्थ्यांना वैद्यकीय महाविद्यालयांतील प्रवेशासाठी किमान 45 पर्सेंटाइल गुणांची आवश्यकता भासणार आहे. गेल्या वर्षी सर्वसाधारण प्रवर्गासाठीचा कट ऑफ 720 ते 138 दरम्यान होता. त्याचबरोबर अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा कट ऑफ 137 ते 108असा होता.
देशातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी दरवर्षी नीट यूजी परीक्षा घेतली जाते. देशातील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) दिल्ली, पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च (पीजीआयएमईआर) चंदीगड, ख्रिश्चन मेडिकल कॉलेज (सीएमएस) वेल्लोर, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरो सायन्सेस (एनआयएमहन्स) बेंगळुरू, संजय गांधी पोस्टग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एसजीपीजीआयएमएस) लखनौ यासारख्या देशातील अव्वल वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एनईईटीच्या आधारे प्रवेश दिला जातो.