सीएची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पूनम श्योरानने दिला मोलाचा सल्ला, सीएची तयारी करताना नेहमी रहा सकारात्मक

| Updated on: Jan 16, 2025 | 5:22 PM

सीए फायनल परीक्षेचा निकाल डिसेंबर 2024 मध्ये जाहीर झाला आहे. यामध्ये पूनम श्योरानने पूर्ण भारतामधून चौथा क्रमांक मिळवला आहे. तिने सांगितलं आहे की ती सहा महिने दररोज आठ ते दहा तास अभ्यास करायची. यानंतर ती स्वतःला फ्रेश करण्यासाठी काही चित्रपट बघायची. आता पुढे तिला एमबीए करण्याची इच्छा आहे.

सीएची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पूनम श्योरानने दिला मोलाचा सल्ला, सीएची तयारी करताना नेहमी रहा सकारात्मक
Follow us on

सीए परीक्षा उत्तीर्ण होणे इतके सोपे नाही. आपण ते करू शकणार नाही या विचारानेच बरेच लोक आपला अभ्यास अर्धवट सोडतात तर काही लोक कठोर परिश्रम आणि मेहनत करून ही परीक्षा उत्तीर्ण होतात आणि इतरांना प्रेरणा देण्याचे काम करतात. पूनम श्योरान ही देखील त्यापैकीच एक आहे जिने चार्टर्ड अकाउंटेंसी म्हणजेच सीए फायनल परीक्षेत ऑल इंडिया मध्ये चौथा क्रमांक मिळवून अनेक विद्यार्थ्यांना प्रेरित केले आहे. टीव्ही 9 ला दिलेल्या मुलाखतीत पूनमने सांगितले की निकाल आल्यानंतर तिचा फोन सतत वाजत होता अनेकांनी फोन आणि मेसेज करून तिचे अभिनंदन केले आहे. त्यासोबतच पूनमने सांगितले की तिला टॉप-10 मध्ये येण्याची अपेक्षा होती पण तिला टॉप-4 रॅक मिळेल असे वाटले नव्हते. पूनमने सीए ची तयारी कशी केली तिने दररोज किती तास अभ्यास केला आणि तिच्या कुटुंबीयांनी तिला कसे प्रोत्साहन दिले ते जाणून घेऊ.

पूनमने सांगितले की सीए फायनल साठी तीन वर्षांचा वेळ मिळतो. त्यापैकी सीए करणाऱ्यांना एका कंपनीत अडीच वर्षे इंटर्नशिप करावी लागते आणि सहा महिने सेल्फ स्टडी करावी लागते. पुढे बोलताना तिने सांगितले की, पहिल्या अडीच वर्षात माझे लक्ष सर्व क्लास पूर्ण करण्यावर होते आणि शेवटच्या सहा महिन्यात माझे लक्ष सेल्फ स्टडी वर होते. पहिल्या अडीच वर्षात दहा ते बारा तास अभ्यास करायचा असा काही माझा ठराविक नियम नव्हता. पण मी विकेंडला भरपूर अभ्यास करायचे कारण बाकीच्या दिवसात मला कामाबरोबरच अभ्यासही करायचा होता.

घरच्यांचा पाठिंबा होता

गेल्या सहा महिन्यात पूनमने रोज आठ ते दहा तास अभ्यास केला. तिने सांगितले की, ‘गेल्या सहा महिन्यापासून मी माझ्या कुटुंबासोबत राहत होते. माझ्या घरातले सर्वजण माझी खूप काळजी घेत होते. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत मला काय हवे काय नको या सर्व गोष्टींची ते काळजी घेत होते. माझ्याकडून हे होणार नाही किंवा मी हे करू शकणार नाही असे मला जेव्हा वाटले तेव्हा माझ्या घरच्यांनी मला साथ दिली. ते मला समजावून सांगायचे आणि आम्हाला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तू हे करशील असा विश्वास ते मला द्यायचे’.

हे सुद्धा वाचा

फोनमध्ये इंस्टाग्राम नव्हते

पूनमने सांगितले की तिच्या फोनवर इंस्टाग्राम नव्हते तर youtube होते. कारण तिथून तिला अभ्यासासाठी आवश्यक असलेले साहित्य मिळत होते. पुढे तिने सांगितले की ती चित्रपट बघायची ज्या दिवशी ती आठ ते दहा तास अभ्यास करायची त्या दिवशी ती स्वतःला फ्रेश करण्यासाठी चित्रपट बघायची. स्वतःला विचलित होण्यापासून वाचवण्यासाठी पूनमने youtube चालवण्यासाठी टायमर सेट केला होता ती फक्त दीड ते दोन तास युट्युब वापरायची.

MBA करण्याची आहे इच्छा

पुनम सांगते की सध्या तिला कन्सल्टन्सीमध्ये जाण्याची इच्छा आहे. पण नंतर तिला एमबीए करून कॉलेजचे जीवन जगायचे आहे. सीए ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना तिने सल्ला देताना सांगितले आहे की, अभ्यासक्रमाचा संपूर्ण कालावधी साडेचार वर्षांचा आहे. सुरुवातीला असे वाटते की ते आपण करू परंतु नंतर विद्यार्थी निराश होतात आणि काही काळानंतर नकारात्मक होऊ लागतात. त्यामुळे स्वतःला सकारात्मक ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.